
>> संध्या शहापुरे
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’- बोलण्यात एक आणि वागणं वेगळं असणाऱया व्यक्तीला, समाजात किंमत नसते. असंख्य देवतांचे अवडंबर न करता परमेश्वर हे एकच स्वरूप आहे असे जाणावे. सर्वाभूती परमेश्वराचे अस्तित्व मानल्यावर त्याला विविध सगुण रूपात पाहताना, कोणताही भ्रम उत्पन्न होत नाही. समर्थ म्हणतात, ‘ईश्वराचा असा दास धन्य होय’ – हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. ज्ञानदेवांनी ‘सर्वाभूती परमेश्वर’ हा ‘अद्वैती’भाव अनेक उदाहरणांसह मांडला आहे. एकत्व न मोडताही व्यवहार कसा होतो याचे सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात दिले आहेत. ‘दळाचिया सहस्रवरी। फाको आपुलिया बहुवसू। काय केवळपणी त्रासो देखीजेल।।’ कमळ आपणच सहस्रदलांनी विस्तार पावले तरी, त्या ठिकाणी कमळावाचून दुसऱया शब्दाचा प्रयोग होत नाही. संत तुकाराम म्हणतात, ‘हरीहरा भेद नाही। करू नये वाद। एकेकाचे हृदयी। गोडी साखरेच्या ठाई।। प्राचीन धर्मग्रंथात, पुराणात अनेक ठिकाणी, विष्णू व शिव अथवा हरी व हर यांच्यात अभेद वर्णन केला आहे. वारकरी संप्रदायाची ही अशीच शिकवण आहे.‘एक तत्व नाम। दृढ धरी मना। हरिसी करुणा, येईल तुझी। ते नाम सोपे रे। राम- कृष्ण -गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी। नामापरते तत्त्व। नाही रे अन्यथा।’



























































