
>> अरुण
कासवाची चालण्याची गती खूपच मंद असते. म्हणून चेंगटपणाने काम करणाऱयाला ‘कूर्मगती’ म्हणतात. ही गती इतर प्राण्यांच्या किंवा सशाच्या तुलनेत कमी वाटली तरी कासवाची चिकाटी अफाट असते. ते ‘स्लो आण्ड स्टेडी’ (मंद पण सतत) चालतच राहते आणि सुस्तावलेल्या सशाबरोबरची शर्यतही जिंकते अशी बोधकथा.
या कासवांचेही दोन प्रकार आहेत. जल-कासव आणि भू-कासव. त्यापैकी जल-कासव म्हणजे टर्टेल आणि भूöकासव म्हणजे टारटाइज. आता ज्ञान-विज्ञान प्रसारामुळे आपल्याला दोन्ही प्रकारचे कासव ठाउढक असतात. आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरीमधल्या वेळास गावात दरवर्षी हजारो टर्टेल (जल-कासव) प्रजोत्पादनासाठी (ब्रिडिंग) डेरा टाकतात. माणसांनी ते पाहण्याचाही महोत्सव केलाय. साधारण एप्रिलमध्ये तो असतो. त्यावेळी तिथल्या कासवांवर सविस्तर लिहिता येईल.
कासवाच्या सर्वच प्र्रजातींना अमेरिकेत टर्टल अशीच संज्ञा आहे. आपणही केवळ ‘कासव’ म्हणूनच सर्वांना ओळखतो. परंतु जैविक भेद लक्षात घ्यातला तर टर्टल पाण्यात म्हणजे मुख्यतः समुद्रात आणि सरोवरात राहतात. ते किनाऱयावर येतात फक्त अंडी घालण्यापुरते. वेळासला तेच घडते. सागरी कासवांचे जथेच तिथे ठराविक काळात अवतरतात.
टारटाइज मात्र वजनदार आणि बहिर्गोल आकाराच्या कठीण कवचाची असतात. आपले पाय आणि डोकं कवचाखाली झाकून ते स्वसंरक्षण करतात. त्यांच्या पायात आपलं बिळ तयार करण्याइतकी शक्ती असते. भू-कासव गवत, नाजूक वेली (विडस) फुले वगैरे आहारावर उपजीविका करतात तर जलकासव छोटे मासे, समुद्री कीटक आणि वनस्पतींवर जगते. भू-कासव बराच काळ जगतात. कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त शे-दोनशे वर्षांचे आयुष्य त्यांना लाभते. जल-कासवाला मात्र कमीत कमी वीस ते ऐंशी वर्षांचे आयुर्मान मिळते. जोनाथन हे लाँगेस्ट लिव्हिंग (दीर्घायुषी) कासव माणसाला माहीत आहे. त्याला या वर्षी 194 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1832 मध्ये त्याचा जन्म झाला. ते नेपोलियनला ठेवलेल्या सेन्ट हेलेना बेटावर राहते. तिथल्या गव्हर्नरच्या घरचा तो शतायुषी सदस्य आहे. वयपरत्वे त्याची दृष्टी मंदावली असून वास घेण्याची क्षमताही कमी झालेली आढळते. जोनाथन 250 किलो वजनाचे असून आकाराने तीन फूट 8 इंच आहे.



























































