
‘अल शिफा ट्रव्हल्स’ या कार्यालयातून विदेशात नोकरी लावण्याचा बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱया टोळीचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱया तिघा भामटय़ांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
मस्जिद बंदर येथे ‘अल शिफा ट्रव्हल्स’ या कार्यालयातून बेरोजगारांना परदेशात नोकरी मिळवून देऊ अशी बतावणी करत फसवले जात होते. परदेशात नोकरीस इच्छुक असणाऱयांकडून अटक आरोपी पासपोर्ट आधार कार्ड, पॅन कार्ड, उमेदवारी कार्ड तसेच काही रक्कम घ्यायचे. पण त्यानंतर नोकरीला पाठविण्यास टाळाटाळ करायचे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पायधुनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास करून तरबेज आलम अन्सारी, मोहम्मद शमीम अन्सारी आणि व्यंकटेश गंगय्या चकल अशा तिघांना अटक केली. या तिघांनी अद्यापपर्यंत 10 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून 50 पासपोर्ट, सहा लॅपटॉप, नऊ मोबाईल व अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.























































