
कर्नाटकातील बंगळुरूमधून बेपत्ता झालेली एक 18 वर्षीय मुलगी केवळ ओटीपीमुळे सापडली आहे. 31 जानेवारीला मैत्रिणीसोबत कॉलेजला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली होती. दोघींनी मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड घरीच सोडले होते. त्यांच्याकडे फक्त आधार कार्ड आणि कॉलेज बॅग होती.
कुटुंबाच्या तक्रारीवरून विद्यारण्यपुरा पोलिसांनी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 10 सदस्यांची टीम तयार करून 100 हून अधिक ठिकाणी शोध घेतला. पुरावा न मिळाल्याने कुटुंब उच्च न्यायालयात पोहोचले. एप्रिलमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. सीआयडीने दोघींच्या घरातून बाहेर पडण्याच्या आणि संभाव्य ठिकाणांची चौकशी सुरू केली. तब्बल 7 महिने या मुलीचा शोध सुरू होता. परंतु, तिचा कुठेच ठावठिकाणा लागत नव्हता. विद्यार्थिनीने आधार कार्ड वापरून एका सरकारी आरोग्य योजनेसाठी अर्ज केला. यासाठी जो मोबाइल नंबर दिला. त्यावर एक ओटीपी आला. सीआयडीने नंबर ट्रेस केला आणि या मुलीपर्यंत पोहोचण्यास त्यांना मदत झाली. या मुलीने पळून जाऊन लग्न केले. सध्या ती गरोदर आहे. अल्पवयीन मुलीला उच्च न्यायालयात हजर केल्यानंतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, तिच्यासोबत घरातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही. सीआयडी तिचा शोध घेत आहे.
- तनिष्का ज्या युवकासोबत गेली होती, त्याच्या कुटुंबाने त्यांचे नाते स्वीकारले. त्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केले आणि कनकपुरा तालुक्यातील एका गावात राहू लागले. अर्जात तिने पतीचा मोबाईल नंबर दिला होता. या नंबरवर ओटीपी आला होता. सीआयडीने नंबर ट्रेस करून तिच्या पतीपर्यंत पोहोचले. चौकशीनंतर पोलिसांना तनिष्काचा पत्ता लागला.






















































