
मोठ्या विश्रांतीनंतर ऐन गणेशोत्सवात पावसाचा ‘कृपावर्षाव’ होणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून खबरदारीचा ‘यलो अलर्ट’ इशारा देण्यात आला आहे.
जुलैमध्ये मुंबईसह राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने गेला सवा महिना कोरडा घालवला आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामीण भागात बळीराजावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मात्र आता परतीच्या पावसाआधी मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सवात वरुणराजाची कृपा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. ऑगस्टपर्यंत सरासरी 44 टक्के पाऊस झाला, तर 11 सप्टेंबरपर्यंत सरासरी 383 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 34 मिमी पाऊस झाला आहे.
बळीराजाला दिलासा
नाशिकसह धुळे, नंदुरबारमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याने हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. उभी पिके अक्षरशः करपून गेली आहेत. मात्र राज्यात पाऊस परतल्याने पिकांना नवसंजीवनी मिळणार असून संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.






















































