ओझोन थराचे संरक्षण ः जागतिक जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< पी. पी. नांदुसेकर
[email protected]

ओझोन थराचे संरक्षण ही केवळ पर्यावरणाची जबाबदारी नसून मानवी आरोग्य, शेती, जैवविविधता आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित जागतिक जबाबदारी आहे. ओझोन-क्षयकारी पदार्थांचा वापर टाळणे, गळती रोखणे, जुन्या शीतकरण उपकरणांची योग्य विल्हेवाट लावणे, ऊर्जा-कार्यक्षम व पर्यावरणपूरक तंत्रज्ञान स्वीकारणे आणि हवामानपूरक जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. आजच्या जागतिक ओझोन दिनानिमित्त…

ओझोन थराचे महत्त्व, त्याचे संरक्षण, ओझोन क्षयकारी पदार्थांचा वापर कमी करणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा आजच्या ‘जागतिक ओझोन दिना’चा प्रमुख उद्देश आहे.

ओझोन (O3) हा ऑक्सिजनच्या तीन अणूंनी बनलेला वायू आहे. वातावरणातील सुमारे 90 टक्के ओझोन स्थितांबरात (Stratosphere) आढळतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 0 ते 15 किमीपर्यंत तपांबर (Troposphere), तर 15 ते 50 किमीपर्यंत स्थितांबर असतो. स्थितांबरातील सुमारे 15 ते 35 किमी उंचीचा भाग ओझोनसाठी विशेष महत्त्वाचा असून त्याला ओझोन थर म्हणतात.

सूर्याच्या अतिनील (uv) किरणांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करणे हे ओझोन थराचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. विशेषतः UV-B व UV-C किरणांचे शोषण करून हा थर मानव, प्राणी, वनस्पती आणि परिसंस्थांचे संरक्षण करतो. अतिनील किरणांचा अतिरेक झाल्यास त्वचेचे विकार, डोळ्यांचे नुकसान आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

ओझोनची नैसर्गिक निर्मिती

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूचे विघटन होऊन स्वतंत्र ऑक्सिजन अणू तयार होतात ः O2 → O + O. त्यानंतर हे स्वतंत्र ऑक्सिजन अणू 2 सोबत संयोग पावून ओझोन तयार करतातः O + O2 → O3. त्यामुळे स्थितांबरात ओझोनची निर्मिती आणि विघटन ही नैसर्गिक प्रक्रिया सतत सुरू असते.

‘चांगला’ आणि ‘वाईट’ ओझोन

स्थितांबरातील ओझोन हा ‘चांगला’ किंवा संरक्षणात्मक ओझोन आहे. मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील तपांबरातील अतिरिक्त ओझोन हा ‘वाईट’ ओझोन मानला जातो. वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषक आणि सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमधून जमिनीच्या पातळीवर ओझोन तयार होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास, दम्याची लक्षणे तसेच पिके आणि वनस्पतींचे नुकसान होऊ शकते.

ओझोन थराला निर्माण झालेला धोका

क्लोरोफ्लोरोकार्बन (CFC), हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन (HCFC), कार्बन टेट्राक्लोराईड, मिथाईल क्लोरोफॉर्म आणि मिथाईल ब्रोमाईड यांसारखे ओझोन-क्षयकारी पदार्थ (ODS) ओझोन थराच्या ऱ्हासास कारणीभूत ठरले. रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनिंग उपकरणे, एरोसोल, अग्निशामक यंत्रणा आणि काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये पूर्वी अशा पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता.

या रसायनांमधून मुक्त होणारे क्लोरिन व ब्रोमिनसारखे घटक स्थितांबरातील ओझोनशी रासायनिक अभिक्रिया करून त्याचे विघटन वाढवतात. त्यामुळे ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी अशा पदार्थांचे उत्पादन व वापर कमी करणे अत्यावश्यक ठरले.

मॉन्ट्रियल प्रोटोकॉल

ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1987 मध्ये स्वीकारलेला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय सहकार्याचा महत्त्वाचा टप्पा ठरला. या करारामुळे अनेक ओझोन-क्षयकारी पदार्थांचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. ओझोन थराच्या संरक्षणासाठी झालेली ही जागतिक कृती पर्यावरणीय करारांच्या यशस्वी उदाहरणांपैकी एक मानली जाते.

किगाली दुरुस्तीचे महत्त्व

2016 मधील किगाली दुरुस्तीने हायड्रोफ्लोरोकार्बन (HFC) वायूंचा वापर टप्प्याटप्याने कमी करण्यावर भर दिला. HFC वायू ओझोन थराला थेट हानी पोहोचवत नसले तरी ते शक्तिशाली हरितगृह वायू आहेत. त्यामुळे त्यांचा वापर कमी करणे हे हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठीही महत्त्वाचे आहे. कमी ग्लोबल वार्मिंग क्षमता असलेले रेफ्रिजरंट, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे आणि पर्यावरणपूरक शीतकरण तंत्रज्ञानाचा स्वीकार हा पुढील काळातील महत्त्वाचा मार्ग आहे.

ओझोन थराचे संरक्षण ही केवळ पर्यावरणाची जबाबदारी नसून मानवी आरोग्य, शेती, जैवविविधता आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित जागतिक जबाबदारी आहे. ओझोन-क्षयकारी पदार्थांचा वापर टाळणे, गळती रोखणे, जुन्या शीतकरण उपकरणांची योग्य विल्हेवाट लावणे, ऊर्जा-कार्यक्षम व पर्यावरणपूरक तंत्रज्ञान स्वीकारणे आणि हवामानपूरक जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे.

(लेखक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त प्रधान वैज्ञानिक आहेत.)