मुंबईत प्रथमच रंगणार शास्त्रीय संगीत महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ असा अधिकृत दर्जा मिळाल्यानंतर शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रथमच शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित हा कार्यक्रम १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६:३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील ‘पु.ल. देशपांडे मिनी थिएटर’ येथे पार पडणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जुन्या आणि समृद्ध परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी विशेष शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सुरेल संगीत महोत्सवात मुंबई आणि परिसरातील संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन व संकलन ‘पंचम निषाद’चे संस्थापक शशी व्यास यांनी केले असून सूत्रसंचालन राणी वर्मा करणार आहेत.