
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनसह सर्व विभागांच्या उपाहारगृहांवर आता प्रशासनाचा ‘कडक वॉच’ राहणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सरप्राइज व्हिजिट करून तपासणी केली जाणार आहे. यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे.
‘एफडीए’ आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कारभार स्वीकारल्यापासून राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत एफडीएकडून जोरदार तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये त्रुटी आढळणाऱ्या उपाहारगृहांना नोटीस देणे किंवा बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील पॅण्टीनदेखील एफडीएच्या कारवाईनंतर तब्बल महिनाभर बंद करण्यात आले होते. याच धर्तीवर आता पालिका प्रशासनाने आपल्या अखत्यारीतील सर्व उपाहारगृहांकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
यावर राहणार नजर
आस्थापना, परिसर, सुविधा
उपकरणे, भांडी, साहित्य
कच्चा माल व पुरवठा नियंत्रण
वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य
परिसरातील कीटक नियंत्रण
स्वच्छता व निर्जंतुकीकरण
कचरा व्यवस्थापन व्यवस्था
उत्पादने व ग्राहक जागरुकता
अन्न सुरक्षा व नोंदी


























































