
कर्नाटकातील विक्रेते शहरात पदपथावर बसून स्थानिक विक्रेत्यांवर दादागिरी करीत आहेत. नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनादेखील ते शिवीगाळ करतात. बाहेरचे विक्रेते शहरातील जनतेची अडवणूक करीत असून, त्याच्याकडून अतिक्रमणे वाढली आहेत. अशा पदपथविक्रेत्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी गडहिंग्लज नगरपालिका सभेत सत्तारूढ सदस्यांनी केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे होते. प्रशासनाची बाजू मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी मांडली. सभेत पाणीपुरवठा, घरफाळा वसुली कमी झाल्याने त्याचा परिणाम नगरपालिका फंड आणि विकास कामावर होणार असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.
गडहिंग्लज शहरातील सुराज्य कॉलनीमधील पाणी, रस्ते, गटारी यांसह पायाभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाती शिंदे-कोरी यांनी केली. चर्चेत बांधकाम सभापती गुंडोपंत पाटील, संतोष चिकोडे यांनी भाग घेतला. सांडपाणी ठिकठिकाणी पसरल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. नागरी वस्तीत घोणस साप आढळला असल्याने तातडीने गटारीची स्वच्छता करण्याची मागणी स्वाती शिंदे-कोरी आणि रश्मीराज देसाई यांनी केली. नगराध्यक्ष सलवादे यांनी संबंधितांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. प्रलंबित रिंगरोडचे काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन दिले.
आजच्या सभेत पदपथ विक्रेत्यांचा मुद्दा गाजला. कर्नाटकातील पदपथ विक्रेते शहरातील स्थानिक विक्रेत्यांना डावलून मनमानी पद्धतीने दादागिरी करतात. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे सदस्य नरेंद्र भद्रापूर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या पदपथ विक्रेत्यामुळेच शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. वाहतूककोंडी होत आहे. यावर प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. विक्रेत्यांचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
पाणीपुरवठा, घरफाळा वसुली कमी झाल्याने त्याचा विकासकामावर परिणाम होणार आहे. पालिकेच्या फंडावरदेखील परिणाम झाला आहे. केवळ 28 टक्के वसुली झाली आहे. वसुलीबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, याकडे नरेंद्र भद्रापूर यांनी लक्ष वेधले. लोकप्रतिनिधी जनतेचे हित साधण्यासाठी प्रयत्नशील असताना प्रशासन मात्र बोटचेपी भूमिका घेत असल्याबद्दल भद्रापूर आणि देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.
फौजदारी गुन्हे दाखल करावेत
n बेकायदेशीर पाणीपुरवठा कनेक्शनसंदर्भात प्रशासन आता तरी कारवाई करणार की नाही. इचलकरंजी महापालिकेप्रमाणे गडहिंग्लज शहरातदेखील बेकायदेशीर पाणीपुरवठा कनेक्शनसंदर्भात थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भद्रापूर यांनी केली. दैनंदिन व आठवडा बाजार कर वसुली फेर ई-टेंडर प्रस्ताव चांगलाच गाजला. बसवराज खणगावे आणि नरेंद्र भद्रापुरे व बांधकाम सभापती गुंडोपंत पाटील यांच्यात चर्चा झाली. सहावेळा निविदा काढूनदेखील ठेक्यासंदर्भात निर्णय झाला नव्हता. अखेर 13 लाखांचे टेंडर मंजूर करण्यात आले.


























































