
उत्सवांमध्ये होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आता न्यायालयानेच हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका दोन पुणेकरांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
अक्षय बिक्कड व हर्षल गरुड यांनी ही जनहित याचिका केली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. नंतर नवरात्री व दिवाळी आहे. सणात ध्वनी प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत आहे. उत्सवात डीजेचा वापर होत असल्याने त्याचा नाहक त्रास होत आहे. तेव्हा न्यायालयानेच याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती वरिष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाला केली. ध्वनी प्रदूषणावर भाष्य केल्याने पुण्यात एका सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला झाला. परिणामी ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठवावे लागले आहे, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
























































