उमेदवाराची हत्या झाली तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही…; नंदीग्रामवरून काँग्रेस आक्रमक, देशव्यापी निदर्शने करण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून पश्चिम बंगालचे राजकारण तापले आहे. काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्या अटकेमुळे आरोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणावर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिलन प्रधान यांची अटक म्हणजे भाजपचे हुकूमशाही राजकारण आहे, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे. आमचे उमेदवार आपला अर्ज मागे घेणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस देशभरात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. उमेदवाराला अटक झाली असली तरी ते निवडणूक लढवत राहतील, असा निर्धार वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.

पश्चिम बंगालमध्ये जे घडत आहे ते पूर्णपणे लोकशाहीविरोधी आहे. पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार आपली उमेदवारी मागे घेणार नाहीत. याविरोधात आम्ही देशभरात निदर्शने करू. देशभरात काँग्रेस भाजपशी लढत आहे, सीपीआय (एम) नाही. देशात मूलभूत लोकशाहीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही. जे लोक आवाज उठवत आहेत, त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असून देशाला ‘बनाना रिपब्लिक’ बनवले जात आहे, अशी टीका वेणुगोपाल यांनी केली. अलप्पुझा येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

नंदीग्राम हा लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. उमेदवाराची हत्या झाली तरी उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार नाही; तोच उमेदवार निवडणूक लढवेल. आम्ही नंदीग्रामचा मुद्दा देशव्यापी आंदोलनात बदलू. निवडणूक आयोगाने या प्रकरणावर एक शब्दही उच्चारलेला नाही. भाजपच्या हुकूमशाही राजकारणाचा अंत होत नाही तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. २०२९ मध्ये आम्ही भाजपचा पराभव करू, असा इशारा वेणुगोपाल यांनी दिला.

पुढील महिन्यात ६ ऑक्टोबरला होणाऱ्या नंदीग्राम पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर के. सी. वेणुगोपाल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या गटाने काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काहीच तासांत, एका जुन्या हत्या प्रकरणात मिलन प्रधान यांना अटक करण्यात आली. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्यांनी या अटकेचा तीव्र निषेध केला आहे.

दुसरीकडे, या प्रकरणावर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनीही केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला टीके लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोग आणि सरकारची युती, लोकशाहीची हत्या, हुकूमशाही, अध्यक्षांचे एकतर्फी निर्णय… हे सर्व कधीपर्यंत चालणार? संपूर्ण देश हा तमाशा पाहत. बंगालमध्ये जे घडत आहे ते लोकशाही खिळखिळी करणारे आहे. देशातील लोकशाहीशी कसा खेळ खंडोबा चालला आहे, याचा देशातील जनतेने विचार करावा, असे आवाहन सिब्बल यांनी केले आहे.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम जागा सोडून भवानीपूर जागा कायम ठेवल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. भाजपने हसिरानी रथ, काँग्रेसने मिलन प्रधान आणि सीपीआयने शांती गोपाल गिरी यांना उमेदवारी दिली आहे. नंदीग्राम आणि रेजीनगरमध्ये ६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.