
>> नीलेश कुलकर्णी
संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमारांच्या विस्मरणाच्या आजाराचा गैरफायदा घेत भाजपने अनेक खेळ्या केल्या. त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता दाखविण्याची संधी त्यांना भाजपच्या ‘आशीर्वाद का दिया’ लावण्याच्या कार्यक्रमाने दिली. समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भविष्यात त्या वाढल्या तर त्या सरकारच्या स्थैर्याला ‘वात’ लावू शकतात. नितीशबाबूंनी त्याचेच सुतोवाच केले आहे.
वयाची पंचाहत्तरी झाल्यानंतर राजकारणातून सक्तीने निवृत्त करून अशा मंडळींना ‘मार्गदर्शक मंडळा’त पाठवायची पद्धत भाजपमध्ये नरेंद्र मोदींनी सुरू केली. मात्र, स्वतः पंचाहत्तरी ओलांडूनही मोदींनी या नियमात स्वतःचा अपवाद केला. मोदींच्या कथनी व करणीमध्ये नेहमीच दुटप्पीपणा राहिला आहे त्याचेच हे द्योतक!
पंतप्रधान मोदींच्या यंदाच्या वाढदिवशी ‘आशीर्वाद का दिया’ म्हणून नवी आयडियाची कल्पना लढविण्यात आली. जागोजागी भाजप कार्यकर्त्यांनी दिवे लावायचे आणि त्या दिव्यज्योतीचे आशीर्वाद मोदींना लाभणार अशी ही कल्पना होती. मात्र नितीश कुमारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदींसाठी ‘आशीर्वाद का दिया’ काही पेटवला नाही. वास्तविक या उपक्रमाचा दंडक एनडीएतील घटक पक्षांसाठीही करण्यात आला होता. मात्र, नितीशबाबूंच्या पक्षातील एकाही नेत्याने मोदींसाठी दिवा लावला नाही. हे जरा अघटितच घडले म्हणायचे.
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस दरवर्षी अनेक वेगवेगळ्या उपक्रमांच्या नावाखाली साजरा होतो. पंचाहत्तरीनंतर मोदी आपणहून खुर्ची सोडतील व देशाची सुटका करतील अशी भाबडी आशा असणाऱयांचा ‘अभी तो मै जवां हूं’ सांगत मोदींनी भ्रमनिरास केला. इतके दिवस मोदींचे हे असले इव्हेंट साजरे करणे भाजपच्या पदाधिकारी व आमदार खासदारांसाठी बंधनकारक होते. मात्र आता घटक पक्षातील सहकाऱयांनाही इच्छा असो वा नसो मोदीनामा वाचावा लागतो. या वर्षी मोदींसाठी ‘आशीर्वाद का दिया’ लावण्याचा उपक्रम होता. वास्तविक, ‘जंतर मंतर’वर ‘सीजेपी’ने मोदींचा ज्या भाषेत उद्धार केला ते पाहता हे असले धाडस करून भाजपने हात दाखवून अवलक्षण करून घ्यायला नको होते. मात्र तरीही हा इव्हेंट केला गेला आणि तो सपशेल अपयशी ठरला. आपल्याच सर्वोच्च नेत्याच्या वाढदिवशी आशीर्वाद का दिया लावायला कोणी स्वयंस्फूर्तीने पुढे येताना दिसले नाही. तेच तेच इव्हेंट तेच ते कार्यक्रम यांना आता भाजप कार्यकर्तेही कंटाळले आहेत. भाजपवर नाराज असलेल्या नितीशबाबूंनी तर ‘दिवा’ न लावता बंडखोरीची जी ‘वात’ लावली आहे ती सांकेतिक आहे. संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमारांच्या विस्मरणाच्या आजाराचा गैरफायदा घेत भाजपने अनेक खेळ्या केल्या. त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता दाखविण्याची संधी त्यांना भाजपच्या ‘आशीर्वाद का दिया’ लावण्याच्या कार्यक्रमाने दिली. समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भविष्यात त्या वाढल्या तर त्या सरकारच्या स्थैर्याला ‘वात’ लावू शकतात. नितीशबाबूंनी त्याचेच सुतोवाच केले आहे.
तिरुक्कुरल आणि पुतीन
नरेंद्र मोदी हे 24 तास राजकारण करणारे नेते आहेत. त्यात ते ‘इव्हेंटसम्राट’ आहेत. कोणत्या कार्यक्रमातून त्याचा राजकीय फायदा कसा घ्यायचा याची त्यांची एक पद्धत आहे. राजधानीत ब्रिक्स संमेलन धुमधडाक्यात पार पडले. अनेक देशांचे राज्यकर्ते एकत्र आले. या संमेलनातील मेन्यू हा शाकाहारी असल्यामुळे वाद निर्माण झाला. मात्र, त्यामुळे ब्रिक्स संमेलन किमान गाजले तरी. तर याच संमेलनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मोदींनी विख्यात तामिळी कवी तिरुवल्लुर यांचा ‘तिरुक्कुरल’ नावाचा काव्यसंग्रह भेट दिला. आता पुतीन यांना हा तामिळी कवितासंग्रह काय डोंबलं कळणार आहे? पण भेट दिला. त्याच वेळी ब्रिक्स् समारोहात नेत्यांच्या स्वागतासाठी जे बॅकग्राऊंड बनविण्यात आले ते तामीळनाडूच्या रामनाथस्वामी मंदिराचे होते. या दोन्ही घटनांकडे तामिळी जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. परिसीमन विधेयक संसदेत लटकलेले आहे. पाच महिन्यांत उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका असल्याने समाजवादी पार्टी या मुद्दय़ावर सरकारला समर्थन देऊ शकत नाही. ‘जंतर मंतर’वरील आंदोलनानंतर द्रमुकने या विधेयकाबद्दलची भूमिका बदलली आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री विजयन यांनी तर हे विधेयक दक्षिण भारत व तामीळनाडूची गळचेपी करणारे आहे, असे सांगून त्याविरोधात तामीळनाडू विधानसभेत ठराव मंजूर करून घेतला आहे. या स्थितीत आपण दक्षिण विरोधी नाहीत हे दाखविण्यासाठी व परिसीमनाचे घोडे गंगेत न्हावे यासाठी या ‘ब्रिक्स’सारख्या जागतिक परिषदेचा ‘पॉलिटिकल इव्हेंट’ करण्यात आला.
अमितभाई कहां है?
अमितभाई कहां गायब है? असा सवाल दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या विचारला जातो आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे हल्ली अमित शहा दिल्लीपेक्षा मुंबईत जास्त असतात. मुंबईत त्यांनी गृहखात्याचे एखादे कार्यालय सुरू केले आहे की काय, अशी शंका येण्याइतपत त्यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. अमित शहा कुठे हरवले आहेत, अशी विचारणा होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या राजधानीत ‘ब्रिक्स’सारखे आंतरराष्ट्रीय स्मेंलन होत असताना देशाचे गृहमंत्री असणारे अमित शहा तिकडे कुठे दिसले नाहीत. अपवाद फक्त एका रात्रीभोजचा. पंतप्रधानांनी विदेशी पाहुण्यासांठी भारत मंडपम्मध्ये आयोजित केलेल्या मेजवानीला शहा हजर राहिले. संमेनलापूर्वी आयोजित बिझनेस फोरमच्या बैठकीलाही ते दिसले नाहीत की त्यानंतरच्या कुठल्याच बैठकीत अमित शहा नव्हते. वास्तविक, मोदीनंतरचे दुसऱया क्रमांकाचे नेते म्हणून अमित शहांची ओळख आहे. ब्रिक्ससाठी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवर्जून आवतण धाडण्यात आले. मात्र शहा मुंबईतच सेवासंकल्प सप्ताहात बिझी राहिले. असे कोणते कारण आहे की ज्यामुळे अमित शहा ब्रिक्समधून ‘गायब’ झाले, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. ‘वर्कोहोलिक’ अमित भाई है कहां? असे विचारण्याची वेळ आली, याचाच मथितार्थ- ‘ऑल इज नॉट वेल!’
































































