
राज्यात विदर्भ, मराठवाडय़ातील जिह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या संकटाच्या काळात पावसाच्या हजेरीबाबत हवामान खात्याने नवे भाकीत केले आहे. बुधवारपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळेल. विदर्भात हवामानातील हालचाली अधिक तीव्र होतील, असा अंदाज हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
यंदा राज्यात मान्सून वेळेवर दाखल झाला. पण पुच्या काळात बहुतांश भागांत पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतपिके करपली असून पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागांत पुकाही दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस कोसळण्यास अनुकूल स्थिती आहे. विशेषतः विदर्भात हवामानातील हालचाली अधिक तीव्र बनणार आहेत. पाऊस परतीच्या मार्गावर असताना राज्यात धो-धो हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिह्यांसह नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हा पाऊस दुष्काळग्रस्त भागात कृपादृष्टी दाखवणार का? सरकारकडून घोर निराशा झाली असताना वरुणराजा तोंडचा घास वाचवणार का? याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला
हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार कृषी विभागाने शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी परिपक्व पिकांची लवकरात लवकर कापणी करावी, साठवलेले धान्य सुरक्षित आणि कोरडय़ा ठिकाणी हलवावे, पावसाळी हवामानात रसायनांची फवारणी व पिकांना पाणी देणे टाळावे, शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी पाण्याचा निचरा करणारी योग्य व्यवस्था करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
असा आहे नवा अंदाज…
राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाटय़ाचे वारे वाहतील.
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची चिन्हे आहेत. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते.
यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिह्यांमध्ये हवामानाची तीव्रता अधिक जाणवू शकते.





























































