
मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘कोस्टल रोड’ वाहनांच्या अनियंत्रित वेगामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोस्टल रोडवर रविवारी झालेल्या बीएमडब्ल्यूच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर प्रशासन जागे झाले आहे. कोस्टल रोडवरील अतिवेगाला ब्रेक लावण्यासाठी 21 नवीन हाय-रिझोल्यूशन कॅमेरे बसवले जाणार आहेत.
वेगमर्यादेचे सर्रास होणारे उल्लंघन, लेनची शिस्त न पाळणे आणि ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ यांसारख्या गंभीर समस्यांना वेसण घालण्यासाठी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची आज तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कोस्टल रोडवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवून वेगावर डिजिटल पाळत ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या सागरी मार्गावर मरीन ड्राइव्हला उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावर सद्यस्थितीत केवळ 7 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. मरीन ड्राइव्हकडून वरळीकडे जाताना लागणाऱया भुयारी मार्गातील एका लेनवर 3 आणि अमरसन्स इंटरचेंज येथे 4 कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र दुसऱया लेनवर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे चालकांकडून वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत आहे.
सध्याच्या कॅमेऱयांना मर्यादा, 170च्या पुढील स्पीडची नोंदच नाही!
सध्या कार्यरत असलेल्या कॅमेऱयांची क्षमता अत्यंत मर्यादित आहे. हे कॅमेरे ताशी 170 किमी पेक्षा जास्त वेगाने जाणाऱया गाडय़ांची नोंद घेण्यास सक्षम नाहीत. तसेच यामध्ये अत्याधुनिक ‘स्पीड डिटेक्शन’ आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन यंत्रणा नसल्याने वेगवान वाहनांवर कारवाई करणे वाहतूक पोलिसांना कठीण जात होते.
बेदरकार चालकांना चाप
अपघातांचे सत्र रोखण्यासाठी महापालिका आता कोस्टल रोडवर 21 नवीन हाय-रिझोल्यूशन आणि उच्च क्षमतेचे तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवणार आहे. यामुळे मार्गावरील एकूण कॅमेऱयांची संख्या 28 होईल. या सर्व कॅमेऱयांचे थेट नियंत्रण मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रूमकडे असेल. या अत्याधुनिक कॅमेऱयांमुळे अतिवेगाने धावणाऱया वाहनांची नंबर प्लेट तत्काळ स्कॅन होऊन थेट ऑनलाइन ई-चलान फाडले जाणार आहे. या कठोर पावलांमुळे बेदरकार चालकांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



























































