
हिंदुस्थानच्या पुरुष कबड्डी संघानेही आशियाई स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने यजमान जपानचा 49-23 गुणफरकाने फडशा पाडला. रेडर आणि बचावपटूंच्या भक्कम कामगिरीमुळे जपानला संपूर्ण सामन्यात हिंदुस्थानी वर्चस्वाला छेद देता आला नाही. आशू मलिकने एका रेडमध्ये जपानचे तीन खेळाडू बाद करत सुपर रेड नोंदवली. हिंदुस्थानी बचावफळीने पहिल्या सत्रात जपानला दोनदा ऑलआऊट केले. हिंदुस्थानने मध्यंतराला तब्बल 31-9 अशी आघाडी घेत सामना जवळपास आपल्या मुठीत घेतला. दुसऱया सत्रात जपानने पुनरागमनाचा प्रयत्न केला. हिंदुस्थानने पवन सेहरावत, अर्जुन देशवाल आणि अस्लम इनामदार यांना मैदानात उतरवत पुन्हा दबाव वाढवला. अर्जुनने मैदानात येताच गुण मिळवला आणि हिंदुस्थानने पुन्हा जपानला ऑलआऊट केले. अखेरच्या टप्प्यात जपानच्या बचावपटूंनी काही रेड रोखल्या. मात्र, तोपर्यंत हिंदुस्थानने विजयासाठी आवश्यक मोठी आघाडी मिळवली होती.




























































