
मेट्रोच्या बेफिकीर कारभाराचा वारंवार पर्दाफाश होत असतानाच आज काशिमीरा येथे भयंकर घटना घडली. अक्षीत हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना एका तरुणाच्या डोक्यात मेट्रोच्या ब्रीजवरून सिमेंटचा भलामोठा ब्लॉक कोसळला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याचे डोके अक्षरशः फुटले आहे. शादाब असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले असून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न आखल्याने अनेकदा अपघात घडत आहेत. २५ वर्षीय शादाब हा मेट्रो ब्रीजजवळील रस्त्यावरून जात असताना अचानक त्याला फोन आला.
त्यामुळे बोलण्यासाठी तो रस्त्याच्या मध्यभागी थांबला. त्याचवेळी ब्रीजवरील मोठा ब्लॉक थेट त्याच्या डोक्यावर येऊन आदळला. काही क्षणातच शादाब हा रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. अशाच अवस्थेत तो तासभर रस्त्यावरच पडून होता.
रिक्षाचालकाच्या मदतीने शादाबला रुग्णालयात दाखल केले
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे अनेक वाहने उभी होती. त्यामुळे तरुण जखमी होऊन पडल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र एका दक्ष नागरिकाच्या निदर्शनास ही बाब येताच त्याने तातडीने एका रिक्षाचालकाच्या मदतीने जखमी शादाब याला मीरा रोड येथील व्होकार्ट रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शादाबच्या कुटुंबाने काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
काशिमीरा परिसरातील मेट्रो कामाच्या ठिकाणी यापूर्वीही बांधकाम साहित्य, लोखंडी सळया कोसळल्या आहेत.
महिनाभरापूर्वी स्कूल व्हॅनजवळ लोखंडी वस्तू कोसळल्याची घटनाही घडली होती.
मेट्रो पुलाजवळ एलिव्हेटेड ब्रिजचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.



























































