
उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. येथे एका टायर ऑइल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत जळून दोन कामगार मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा कारखाना अग्निशामक केंद्रापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या गजनर परिसरातील जरीहा गावाजवळ ‘ओम जेव्हीआरडी’ या नावाने मागील पाच वर्षांपासून कार्यरत होता. येथे बंदिस्त आणि ऑक्सिजनविरोधक चेंबरमध्ये उच्च तापमानावर टाकाऊ टायरपासून ऑइल तयार केले जात असे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सहा कामगार एका सुमारे ३० फूट उंच टाकीमध्ये टायर लोड करण्याचे काम करत होते. अचानक लागलेली आग वेगाने पसरल्यामुळे आकाशात काळ्या धुरातले मोठे लोण पसरले. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकल्यामुळे ते दोन कामगार खाली जमिनीवर कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, टाकीजवळ काम करणारे इतर चार कामगार आणि ऑइल भरणाऱ्या टँकरचा ड्रायव्हर सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले.
माहिती मिळताच कानपूर देहातचे मुख्य अग्निशामक अधिकारी प्रतीक श्रीवास्तव यांनी तीन गाड्यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. ऑइलच्या दोनपैकी एका टाकीला आग लागली होती, त्यावर लगतच्या टाकीला थंड करण्याचे काम करत सुमारे ४० मिनिटांत आटोक्यात आणण्यात आले. कानपूर देहातच्या पोलीस अधीक्षक श्रद्धा नरेंद्र पांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अलोक प्रसाद आणि अधिकारी संजय सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.
कारखान्याचे मालक रमेश चंद्र गुप्ता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही कामगार स्टोरेज भागात बिडी घेऊन जात असताना पकडले गेले होते. सोमवारी देखील काही कामगारांनी आतमध्ये बिडी नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून यामुळेच आग लागली असावी, असा दावा त्यांनी केला आहे. पोलीस या दाव्याची आणि आगीच्या नेमक्या कारणाची सखोल चौकशी करत आहेत.


























































