गुजरातच्या सीमेवरून देशात ड्रग्जची तस्करी, त्यात भाजपचाही सहभाग; पंजाबच्या मंत्र्यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. गुजरातच्या सीमेवरून देशात अमली पदार्थ येत असून, त्यामध्ये भाजपचा सहभाग असल्याचा आरोप चीमा यांनी केला आहे.

चीमा म्हणाले की, “आज संपूर्ण देशाला माहिती आहे की गुजरातच्या सीमेवरून देशभरात अमली पदार्थ येत आहेत. संपूर्ण भाजप त्यात सहभागी आहे आणि देशातील तरुणांना अमली पदार्थांच्या आहारी लोटत आहे. आधी तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यात ढकलायचे आणि नंतर अमली पदार्थ संपवण्याचा दिखावा करायचा,” असा आरोप हरपाल सिंह चीमा यांनी केला.

पंजाबमधील अमली पदार्थांच्या परिस्थितीवर बोलताना चीमा यांनी 2007 ते 2017 या काळातील अकाली दल-भाजप सरकारवरही निशाणा साधला. या काळात पंजाबमध्ये अमली पदार्थांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढला होता, असा दावा त्यांनी केला. “ज्यांनी अमली पदार्थ पसरवले, तेच आता अमली पदार्थ संपवण्याची भाषा करत आहेत,” असे चीमा म्हणाले.

दरम्यान, पंजाबमध्ये मुख्यमंत्री गेल्या चार वर्षांपासून अमली पदार्थांविरोधात सातत्याने काम करत असल्याचा दावा चीमा यांनी केला. त्यांच्या सरकारच्या काळात पंजाबमधील अमली पदार्थांचे संकट जवळपास संपुष्टात आले असल्याचेही त्यांनी म्हटले.