‘SIR प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच आक्षेप होता’, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. SIR प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच आपण त्यातील काही बाबींवर आणि त्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर टीका करत असल्याचे कुरेशी यांनी म्हटले.

SIRच्या प्रक्रियेबाबत सुरुवातीपासूनच आपल्याला काही शंका होत्या. मात्र, निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेची आता अंतर्गत माहिती समोर आल्यानंतर आपली भूमिका अधिक स्पष्ट झाली असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

“मी सुरुवातीपासूनच SIRच्या या नव्या प्रयोगावर तसेच त्यासाठी पाळल्या जात असलेल्या प्रक्रिया आणि नियमांवर टीका करत आलो आहे. आता दोन निवडणूक आयुक्तांची अंतर्गत भूमिका समोर आली आहे,” असे कुरेशी म्हणाले.

दोन निवडणूक आयुक्तांनी यापूर्वी सार्वजनिकपणे भूमिका का मांडली नाही, असा प्रश्न आपण उपस्थित करत होतो, असेही त्यांनी सांगितले. “मी दोन्ही निवडणूक आयुक्तांवरही टीका करत होतो. ते समान अधिकार असलेले सदस्य आहेत आणि त्यांना मतदानाचा समान अधिकार आहे. आयोगातील निर्णय एकमताने किंवा दोन सदस्यांच्या बहुमताने घेतले जातात. त्यामुळे ते आपली भूमिका का मांडत नाहीत, असा माझा प्रश्न होता,” असे कुरेशी यांनी स्पष्ट केले.

मात्र, दोन्ही आयुक्त अतिशय शांतपणे आणि कोणताही गाजावाजा न करता आपले आक्षेप नोंदवत होते आणि त्याबाबत टिपणे लिहित होते, हे आता समोर आले आहे. ही बाब सकारात्मक असल्याचे कुरेशी यांनी म्हटले.

“ते अतिशय शांतपणे आणि संयमाने विरोध नोंदवत होते, आपली मते लेखी स्वरूपात मांडत होते. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर पुन्हा वाढला आहे. अन्यथा मी त्यांच्याबद्दलचा आदर गमावत होतो,” असे कुरेशी म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या घटनात्मक भूमिकेवरही कुरेशी यांनी भाष्य केले. निवडणूक आयोगाने निष्पक्ष राहावे, अशीच राज्यघटनेची अपेक्षा आहे, असे त्यांनी नमूद केले.

निवडणूक आयोग बहुसदस्यीय करण्यामागेही हाच उद्देश असल्याचे कुरेशी यांनी सांगितले. त्यांच्या मते, एका व्यक्तीच्या निर्णयाऐवजी अनेक सदस्य असलेल्या आयोगामुळे निर्णय प्रक्रियेत चर्चा, मतभेद आणि समतोल राखला जाऊ शकतो, असेही कुरेशी म्हणाले.