
SIR च्या मुद्द्यावरून आता देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाचे अपहरण करण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला.
दिल्ली आणि हरियाणा विधानसभा निवडणुका रद्द करून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी यावेळी सिंघवी यांनी केली आहे. सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय घटनात्मक संस्था आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त मिळून आयोगाचे निर्णय घेतात. त्यामुळे एखाद्या एका व्यक्तीकडून एकतर्फी निर्णय घेतले जाऊ शकतात का, असा सवाल त्यांनी पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला.
या मुद्द्यावर अधिक बोलताना सिंघवी म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्तांनी केवळ देशाचीच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांचीही दिशाभूल केली. निवडणूक आयोगातील निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी आयोगातच ‘अंतर्गत बुलडोझर’ असल्याचा दावा केला. अहवालानुसार निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा आक्षेप नोंदवले. मतदारांची नावे समाविष्ट करणे, वगळणे, मतदार यादीशी संबंधित माहिती-तंत्रज्ञान प्रणाली आणि फॉर्म-6 मधील बदलांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे अहवालात म्हटले आहे.
नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या Form-6 मध्ये SIRशी संबंधित एक नवीन प्रश्न समाविष्ट करण्यात आला होता. या बदलासाठी संबंधित नियमांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याचा आक्षेप निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांनी नोंदवल्याचे अहवालात म्हटले आहे. SIRसह सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने एकमताने घेण्यात आल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर सिंघवी यांनी दिल्ली आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका रद्द करून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.



























































