
दिल्लीतील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एक क्रूर घटना उघडकीस आली आहे. इंटर्नशिपवरून घरी परतत असताना एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बाईकवरील दोन तरुणांनी पाठलाग करत विनयभंग केला. यानंतर तरुणीच्या स्कूटरला धडक देत तिला रस्त्यावरून खाली पाडले. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्क मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या हौझ खास परिसरात 11 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा कथित छळ, पाठलाग आणि स्कूटरला बाईकने हेतुपुरस्सर धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आरोपानुसार, 11 सप्टेंबरच्या रात्री ती साकेत येथील तिच्या कार्यालयातून स्कूटरवरून घरी परतत होती. पंचशील मेट्रो स्टेशनजवळ बाईकवरील दोन अनोळखी तरुणांनी तिच्याजवळ येऊन अश्लील शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग केला आणि थोड्या अंतरावर तिच्या स्कूटरला त्यांच्या बाईकने धडक दिली. यामुळे ती रस्त्यावर पडली आणि सुमारे 100 ते 150 मीटरपर्यंत फरफटत गेली, यात तिला गंभीर दुखापत झाली.
गंभीर दुखापतीमुळे तरुणीला प्लास्टिक सर्जरीची गरज भासू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्या विद्यार्थिनीला मदत केली आणि तिला रुग्णालयात नेले. तरुणीला सुरुवातीला साकेत येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर नोएडा येथील मेदांता रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

























































