ज्ञानेश कुमार यांना अटक करा, SIR झालेल्या राज्यांमध्ये पुन्हा निवडणुका घ्या – ममता बॅनर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर वादावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी करत म्हटले आहे की, त्यांच्या नेतृत्वात ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रियेनंतर निवडणुका झाल्या आहेत, तिथे पुन्हा नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात.

मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप

एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादीत गडबडी करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावे आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ममता बॅनर्जी यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये एसआयआर नंतर निवडणुका पार पडल्या आहेत, त्या ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेचे पुनरावलोकन व्हावे आणि गरज पडल्यास तिथे पुन्हा मतदान घेण्यात यावे. देशातील दोन निवडणूक आयुक्तांनी एसआयआर बाबत अनेक मुद्दे उपस्थित केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर इंडिया आघाडीचे घटक पक्ष लवकरच यावर बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भाजपच्या आयटी सेलचा निवडणूक यंत्रणेवर ताबा

निवडणूक यंत्रणेवर भाजपच्या आयटी सेलने पूर्णपणे ताबा मिळवला असल्याचा आरोप देखील ममता बॅनर्जी यांनी केला. त्या म्हणाल्या की, न्यायव्यवस्थेनेही न्यायासाठी सर्वसामान्य जनतेचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. हिंदुस्थानात कोणतीही हुकूमशाही सुरू नसून, हा एक लोकशाही असलेला देश आहे.