निवडणूक आयोग लोकशाहीचा कत्तलखाना झालाय; ज्ञानेश कुमार घटनात्मक पदावरील माफिया; संजय राऊत कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याचा निवडणूक आयोग लोकशाहीचा कत्तलखाना झाला असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे घटनात्मक पदावर बसलेले माफिया आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. गुरुवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाही आणि घोटाळेबाज कारभाराविरोधात निवडणूक आयोगात बंड झाले आहे. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेला आणि त्यातील अनेक गोष्टींना विरोध दर्शवला होता. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त छापल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत बोलताना संजय राऊत राऊत म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगात बंड झाले आहे. हे महाशय निपक्ष किंवा स्वयंत्र पद्धतीने काम करत नसून सरकारचे एजंट म्हणून काम करतात. ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कारनाम्यांमुळेच बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या तीनही निवडणुका भाजप जिंकू शकला. या राज्यातील निवडणुका पुन्हा घ्या अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजद नेते तेजस्वी यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केली आहे. कारण तिथे निवडणुका झाल्याच नाहीत.

निवडणूक आयोगाची ‘मॅच फिक्सिंग’ उघड; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे

ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून भाजप किंवा महाराष्ट्रात शिंदे गटाने निवडणुकांचा अपहार केला त्याला वोट चोरी म्हणा किंवा इलेक्शन चोरी म्हणा, ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. ज्ञानेश कुमारसारखे माणसं देशाचे शत्रू आहेत. त्यांचा बॉस अमित शहा आहे. अमित शहा गृहमंत्री असून देशाचा निवडणूक आयोग गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. ज्ञानेश कुमार हा शहांचा माणूस असून निवडणूक आयोगात एक माफिया रॅकेट चालवले जाते. सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाहीचा कत्तलखाना आहे. हा कत्तलखाना बंद करायचा असेल तर सगळ्या विरोधी पक्षांनी फक्त एकत्र आवाज उठवून चालणार नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी दिलेल्या उत्तरालाही काही अर्थ नाही. ज्ञानेश कुमार हे घटनात्मक पदावर बसलेले माफिया आहेत आणि त्या माफियांचा बॉस गृहमंत्री आहे. मतदार यादीतील 13 कोटी नावे हुकुमशाही पद्धतीने डिलिट करण्याला दोन निवडणूक आयुक्तांनी विरोध केला. जी गोष्ट चुकीची आहे त्याला विरोध व्हावा किंवा बहुमताने एखादी गोष्ट मंजूर व्हावी किंवा फेटाळली जावी म्हणून तिघांचा निवडणूक आयोग आपण बनवला. दोन निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यात 14 वेळा आक्षेप घेतला. ज्ञानेश कुमार हे गृहमंत्र्यांचे छोटा शकील असून ते लोकशाहीची हत्या करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत म्हणजे काय? धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा द्यायची किंवा त्यांचा राजीनामा घ्यायची इच्छा नव्हती आणि मोदी-शहाही सांगत होते. पण नंतर काय झाले. संसदेवर लाखो झुरळं धडकली तेव्हा राजीनामा घ्यावा लागला. आता निवडणूक पद्धती, यंत्रणा भ्रष्ट करून एक व्यक्ती म्हणते मी राजीनामा देणार नाही. याच माफियागिरीला संरक्षण देण्यासाठी संसदेत एक बील मंजूर करण्यात आले. तेलंगणामध्ये आधीचे निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला आणि त्यांच्या अटकेचा विषय निर्माण झाला तेव्हा अमित शहांनी घाईघाईने निवडणूक आयुक्तांना अटक करता येणार नाही अशा प्रकारचे बील आले आणि मंजूर केले. त्यावेळी 110 खासदार निलंबित झाले होते. आता त्याचा वापर ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या छोटा शकील याला संरक्षण देण्यासाठी करणार, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पण कितीही काही केले तरी ज्ञानेश कुमार यांना जावे लागेल. त्यांनी केलेली कामं मोठ्या प्रमाणात उघड होतील आणि त्यांच्यावर खटलेही चालवले जातील, असेही संजय राऊत म्हणाले.