ऑक्सिजन बंद केल्याने बाळ गुदमरले; हायकोर्टाचा दोन डॉक्टरांना दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीयूतील ऑक्सिजन बंद केल्याने एक बाळ गुदमरले. याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पुणे येथे ही घटना घडली. तक्रारदाराचे बाळ खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये होते. तेथे हे दोन डॉक्टर आले. त्यांनी धिंगाणा घातला. बाळाला येथून घेऊन जा, असे मला धमकावले. नंतर आयसीयूतील ऑक्सिजन बंद केला. याने बाळाला अधिक त्रास झाला, अशी तक्रार या तक्रारदाराने पोलिसांत केली. याचा गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल करण्यात आले. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या दोन डॉक्टरांनी याचिका दाखल केली होती. न्या. रणजितसिंह भोसले यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हे हॉस्पिटल माझ्या जावयाचे आहे. मी ते मुलीला दिले. त्याच्या मालकीवरून आमचा जावयासोबत वाद सुरू आहे. याच वादातून जावयाने तक्रारदाराला ही तक्रार करण्यास सांगितले आहे. आम्ही असे कोणतेही कृत्य केलेले नसल्याने गुन्हा रद्द करावा, अशी विनंती त्यांनी केली. ती अमान्य करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.