
भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले असून, मिरवणूक संपण्यास तासभर बाकी असताना कार्यकर्त्यांच्या झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याच्या आरोपावरून वातावरण तापले आहे. या गोंधळानंतर काही वेळातच मिरवणुकीत सहभागी असलेले शुक्लेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक वाघस्कर हे अचानक रस्त्यावर कोसळले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वाघस्कर यांच्या मृत्यूमुळे संतप्त भिंगारवासीयांनी आज सकाळी ‘भिंगार बंद’ची हाक देत अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत वाघस्कर यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात येत होती.
बुधवारी (23 रोजी) सायंकाळी भिंगार येथे गणेश विसर्जन मिरवणूक मोठय़ा उत्साहात सुरू होती. मिरवणुकीत डीजेचा वापरही करण्यात आला होता. रात्री सव्वानऊच्या सुमारास मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. मिरवणूक संपण्यास अवघा तासभर बाकी असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या गोंधळानंतर काही वेळाने दीपक वाघस्कर हे मिरवणुकीतच अचानक कोसळले. त्यांना पोलीस आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, वाघस्कर यांचा मृत्यू पोलिसांच्या लाठीमाराने झाल्याचा आरोप संतप्त नागरिक व कार्यकर्त्यांनी केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले.
घटनेची माहिती मिळताच, आमदार संग्राम जगताप घटनास्थळी दाखल झाले. नागरिक व कार्यकर्त्यांकडून माहिती घेत पोलिसांच्या लाठीमारामुळेच युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली. घटनेनंतर गणेश विसर्जनाची मिरवणूकही थांबवण्यात आली. एक गणपती रस्त्यावरच थांबून राहिल्याने परिस्थिती गंभीर बनली. दरम्यान, या घटनेनंतर आज सायंकाळी उशिरा उर्वरित दोन मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
‘रास्ता रोको’ने वाहतूक ठप्प
पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही भिंगारवासीयांचा संताप कमी झाला नाही. सकाळी 11 वाजता नागरिकांनी नगर-पाथर्डी मार्गावर ‘रास्ता रोको’ सुरू केला. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. भिंगार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय नेते आंदोलनात सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
व्हिडीओ तपासले; वाघस्कर त्यात दिसत नाहीत – अधीक्षक सुदर्शन
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. दीपक वाघस्कर हे मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटल्याने खाली पडले. पोलीस आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. आपण घटनेची चौकशी केली असून, व्हिडीओ फुटेजही तपासले आहे. व्हिडीओमध्ये वाघस्कर दिसत नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. ‘या घटनेची चौकशी करण्यात येणार असून, कोणाची चूक आढळल्यास कारवाई केली जाईल,’ असे सुदर्शन यांनी स्पष्ट केले.
जमाव खोटे बोलेल का? आमदार संग्राम जगताप
आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘पोलिसांनी भगवे ध्वज आणि गुलालाच्या गोण्या हिसकावून घेतल्याचे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत. एवढा मोठा जमाव पोलिसांविरोधात खोटे बोलेल का?’ असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला. दरम्यान, ‘शहरातील प्रमुख गणेश मंडळांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. योग्य तो गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर शहरातील गणेश मंडळांकडून विसर्जन न करण्याची भूमिका घेतली जाऊ शकते,’ असा इशारा दिला.
भिंगार कॅम्पच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचारी सक्तीच्या रजेवर
भिंगार येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जची चौकशी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यामार्फत केली जाणार आहे. तसेच दीपक वाघस्कर यांच्या झालेल्या मृत्यूची चौकशी गुन्हे शाखेच्या निरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान भिंगार कॅम्पच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती उपस्थित होते.






























































