
मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यात हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर गुरुवारी संध्याकाळी एका सशस्त्र दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात चार नागा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्यानमारस्थित कुकी नॅशनल आर्मी-बर्मा या संघटनेच्या संशयित दहशतवाद्यांनी पिलॉन्ग नागा या गावात घुसून नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कामजोंग जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमेवर हे गाव वसलेले आहे. या भीषण हल्ल्यात फामी जाजो (४३), निंगथेम कसाक (३५), बेटरसन जाजो (५०) आणि वरेईशिम जाजो (६७) यांचा मृत्यू झाला. यामध्ये वरेईशिम जाजो आणि फामी जाजो हे बाप-लेक होते. घटनेनंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी कामजोंग जिल्हा मुख्यालयात आणण्यात आले आहेत.
२४ तासांचा बंद पुकारला
या हत्याकांडाचा तीव्र निषेध करत तांगखुल नागा लाँग या संघटनेने शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात २४ तासांचा आपत्कालीन बंद पुकारला आहे. टीएनएलचे सचिव थानरिंगम मुईवा यांनी गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात हा बंद नागरीकांच्या हत्येविरोधात असल्याचे स्पष्ट केले. या काळात वीज, वैद्यकीय सेवा, अग्निशमन दल आणि अंत्यसंस्काराशी संबंधित अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध
दरम्यान, खानुइथोट-खोन या तरुण संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांच्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उखरुल दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. परिसरात पसरलेला हिंसाचार आणि सुरक्षिततेची बिकट परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच नागाबहुल भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य व केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि या हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.




























































