
एकीकडे भीषण दुष्काळ, तर दुसरीकडे पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराष्ट्र अडकला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. पावसाच्या ओढीमुळे पिकं करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे अशी दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात पूर आला आहे.
छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी वाड्या-वस्त्यांमध्ये शिरल्याने प्रशासनाने तातडीने बचाव आणि स्थलांतर मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान सुमारे 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गुरुवारी दुपारपासून सुरू झालेली ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असूनआता पूराचे पाणी हळूहळू ओसरू लागल्याने बाधित भागातील परिस्थितीत सुधारणा होत आहे. जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्थलांतराची कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, बिनागोंडा आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका आजारी मुलीला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पुराच्या पाण्याने भरलेल्या गुंडेनूर नाल्यातून पथकाने मुलीला सुरक्षितपणे बाहेर आणले. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
#WATCH | Gadchiroli, Maharashtra: Around 525 people were evacuated to safer locations after heavy rainfall in neighbouring Chhattisgarh triggered flooding in the Bhamragad area of Gadchiroli district. The evacuation operation continued from Thursday afternoon until late at night,… pic.twitter.com/K1JpZLn3h7
— ANI (@ANI) September 26, 2026
पूरस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असली तरी नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी पूर्णपणे सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तसेच ज्या रस्त्यांवर अद्याप पाणी वाहत आहे, अशा ठिकाणी प्रवास टाळावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच बाधित भागातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकांकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.


























































