ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण द्या म्हणणाऱ्यांचा मेंदू नॅशनल म्युझियममध्ये ठेवावा, संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधक आक्रमक झालेले असताना पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावरून आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली असून हा देश, देशातील लोकशाही खड्ड्यात घातल्याबद्दल ज्ञानेश कुमार यांनी भारतरत्नच द्या आणि ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण द्या म्हणणाऱ्यांचा मेंदू नॅशनल म्युझियममध्ये ठेवा, असा टोला लगावला. ते शनिवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, हा देश, देशातील लोकशाही खड्ड्यात घातल्याबद्दल, लोकशाहीची हत्या केल्याबद्दल, तसेच कोट्यवधी मतदारांचा संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार हुकुमशाही पद्धतीने काढून घेतल्याबद्दल आणि मनमानी केल्याबद्दल भाजप लोकशाहीचा दुष्मन नंबर एक ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण द्या म्हणत असेल तर अशी मागणी करणाऱ्याचा मेंदू दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवला पाहिजे. पद्मविभूषण कशाला, थेट भारतरत्नच द्या किंवा घोटाळेबाज निवडणूक आयुक्तांना नोबेल पुरस्कार मिळावा अशी शिफारस करा.

राजकीय विरोधकांना शत्रू मानणाऱ्या राज्यकर्त्यांचे कायमचे विसर्जन व्हावे, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

दरम्यान, निवडणूक आयोगातील मतभेद समोर आल्यानंतर एनडीएतील तीन घटकपक्षांनीही निवडणूक आयोगाकडे याचा खुलासा मागितला आहे. मात्र खुलासा मागण्याऐवजी राजीनामा घ्या, असे संजय राऊत म्हणाले. चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि चंद्रबाबू नायडू यांनी हा खुलासा मागितली आहे. पण खुलासा करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अन्यथा देशात इतके मोठे आंदोलन उभे राहील की सरकार पळून जाईल, असे संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एसआयआरचा निर्णय होईल, पण सर्वात आधी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यायला हवा. ज्ञानेश कुमार यांच्यासारखा भ्रष्ट माणूस, लोकशाहीचा मारेकरी, भाजपचा एजंट मुख्य निवडणूक आयुक्त पदावर बसून जे कांड करतोय त्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे. लोकांचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आधी दोन व्यक्तींचा राजीनामा घ्यावा. एक म्हणजे गृहमंत्री अमित शहा, ज्यांच्या आदेशाना हा माणूस करतोय आणि दुसरा म्हणजे ज्ञानेश कुमार. या दोघांचे राजीनामे घेतले तर लोकशाही मोकळा श्वास घेईल.