
दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा, चारा छावण्या सुरू करा अशी मागणी करणाऱ्या विरोधकांसाठी कुबुद्धी शब्द वापरणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पण जो मुख्यमंत्री विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नेमू देत नाही त्याच्याकडून काय अपेक्षा करणार. त्यामुळे राजकीय विरोधकांना शत्रू मानणाऱ्या राज्यकर्त्यांचे कायमचे विसर्जन व्हावे अशी प्रार्थना गणपतीला आम्हीही केली, असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
शनिवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला. विरोधकांना सुबुद्धी मिळो आणि कुबुद्धीचं विसर्जन होवो, असे विधान फडणवीस यांनी केले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय आणि वैचारिक विरोधकांना जे शत्रू समजतात अशा राज्यकर्त्यांचे कायमचे विसर्जन व्हावे अशी कामना आम्हीही गणपतीकडे केली आहे.
मुंबई, पुणे हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे माहेरघर आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला शोभत नाही. गणपती बुद्धीची देवता आहे, मग तुम्ही काय बुद्धी घेतली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय विरोधक जी काय भूमिका मांडतात त्याला तुम्ही कुबुद्धी म्हणतात. आम्ही दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, चारा छावण्या सुरू करा अशी मागणी केली. याला तुम्ही कुबुद्धी म्हणता?
मुख्यमंत्र्यांना देशाचे संविधान वाचायला दिले पाहिजे. त्यांना हे मुख्यमंत्रीपद रेडिमेड मिळाले, संघर्ष करून नाही. राजकीय संघर्ष करून पद मिळवणाऱ्याचा विचार सर्वसमावेशक, सर्वमान्य असतो. सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची त्याची भूमिका असते. पण हे दिल्लीतील बॉसने नेमलेले मुख्यमंत्री आहेत. स्वत:च्या कर्तबगारीवर मुख्यमंत्री झालेले असते तर विरोधकांच्या बाबतीत अशा प्रकारची भाषा केली नसती. महाराष्ट्रात याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्याने अशी भाषा केली नाही. आमचे सरकार होते तेव्हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली नाही, मनोहर जोशी यांनीही केली नाही आणि इतरांनीही केली नाही. हे बाळासाहेबांचे संस्कार होते. यांना कोणते संस्कार आहेत. राजकीय विरोधकांना दुष्मन मानून चिरडण्याचे संस्कार यांचे आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
विरोधकांनी भ्रष्टाचाराची प्रकरण काढली, ही कुबुद्धी आहे का? विरोधकांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या घोटाळ्याबद्दल जाब विचारला, ही कुबुद्धी आहे का? महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे वक्तव्य आपल्या राजकीय विरोधकांच्या बाबतीत करणे हे अजिबात शोभत नाही. पण जो मुख्यमंत्री विधिमंडळात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नेमू देत नाही त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.


























































