लेन्स-आय – अंगणातील तुळस…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< राखी अरदकर
[email protected]

आमच्या अंगणात तुळशी वृंदावन आहे. रोजच्या येण्या-जाण्यात तुळस नजरेसमोर असते. सकाळी तिच्यासमोर दिवा लावला जातो, पाणी घातले जाते. त्यामुळे तुळस आमच्या घराच्या रोजच्या जीवनाचा एक भागच झाली आहे. पण इतकी जवळ असूनही तिच्याकडे निरखून पाहण्याचा योग मात्र फारसा आला नव्हता.

काही दिवसांपूर्वी तुळशीचे निरीक्षण करत असताना अचानक माझी नजर तिच्यावर आलेल्या नाजूक गुलाबी फुलांवर गेली. क्षणभर थांबून मी तिच्याकडे पाहत राहिले. बारीकशा देठावर एकामागोमाग एक उमललेली छोटी छोटी फुले, त्यांची रचना, फुलोऱ्याची लय आणि त्याभोवती तयार झालेल्या मंजिऱ्या… सगळंच खूप सुंदर दिसत होतं.

तुळशीला आपण प्रामुख्याने तिच्या पानांसाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखतो. पण तुळस फुलते तेव्हा तिचं एक वेगळंच रूप समोर येतं. हिरव्या पानांमध्ये उठून दिसणारा हा गुलाबी फुलोरा अगदी छोट्याशा चित्रासारखा वाटला.

खरं तर आपण रोज अनेक गोष्टी पाहतो. पण त्या खरंच पाहतो का? एखादी गोष्ट रोजची झाली की तिच्यातलं सौंदर्य आपल्याला जाणवत नाही. तुळशीसोबतही कदाचित असंच झालं असावं. रोज दिसणारी म्हणून तिच्याकडे बारकाईने पाहण्याची गरजच वाटली नाही. पण त्या दिवशी थोडं थांबून पाहिलं आणि जाणवलं. आपल्या अगदी आसपास निसर्ग किती सुंदरपणे आपलं काम करत असतो!

तुळशीच्या पानांचा उपयोग पारंपरिक पद्धतीने चहा, काढा आणि विविध घरगुती उपयोगांसाठी केला जातो. तिचे औषधी महत्त्वही मोठे आहे. आयुर्वेदात तुळशीचा उपयोग पारंपरिकरीत्या सर्दी, खोकला, घशातील त्रास, पचनाशी संबंधित पारी अशा विविध कारणांसाठी केला जातो. त्यामुळे तुळस ही घराच्या अंगणातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. तुळशीला आपल्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. तिच्याभोवती अनेक परंपरा आणि श्रद्धा जोडलेल्या आहेत. पण त्याचबरोबर तिचं वनस्पती म्हणून असलेलं सौंदर्यही आपण अनुभवायला हवं.

तुळशीचा हा फुलोरा पाहताना आणखी एक गोष्ट जाणवली, निसर्गाकडे पाहण्यासाठी नेहमी मोठ्या प्रवासाची गरज नसते. कधी कधी आपल्या अंगणात, घराच्या दाराशी, एखाद्या कुंडीतच निसर्गाची सुंदर कलाकृती उमललेली असते. फक्त आपली नजर थोडी निवांत आणि संवेदनशील असायला हवी.

म्हणून तुमच्या घरातही तुळस असेल तर आज एकदा तिच्याकडे थांबून पाहा. तिची पाने, देठ, मंजिरी आणि फुलोरा निरखून पाहा. कदाचित रोज दिसणारीच तुळस त्या दिवशी तुम्हाला अगदी नव्याने दिसेल.