
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहारांवरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी दावा केला होता की, मोदी आणि शहा यांनी ज्ञानेश कुमार यांना स्वतःचा अंपायर बनवून निवडणुकांमध्ये मॅच फिक्सिंग केली आहे. देशातील निवडणुका आणि लोकशाही संस्था नष्ट करण्याचे काम भाजप सरकार करत असून, या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी मतचोरी, कायदा चोरी आणि संस्था चोरी, असा तिहेरी हल्ला चढवत ज्ञानेश कुमार यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या विरोधात काम करून राष्ट्रद्रोह केला आहे, त्यामुळे त्यांनी आता तत्काळ राजीनामा देऊन या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनावे, अशी मागणी त्यांनी केली.
मतचोरीच्या या संपूर्ण कटाची सखोल माहिती काँग्रेसकडे असून, येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची या प्रकरणी निश्चितच चौकशी होईल. तसेच लोकशाहीचे नुकसान करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.





























































