पनवेल हरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष – ३ च्या पथकाने जेरबंद केले. लहू पवार (४०), सचिन पवार (२२), अंकुश पवार (३४) आणि शहाजी पवार (५०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत नवी मुंबई, रायगड आणि ठाणे परिसरातील आठ घरफोडींचे गुन्हे उघड झाले.
तळोजा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. त्यानुसार सापळा रचून लहू पवार, सचिन पवार, अंकुश पवार, शहाजी पवार या चौघांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तळोजा पोलीस ठाणे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, पनवेल शहर पोलीस ठाणे, खोपोली पोलीस ठाणे आणि कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण आठ गुन्ह्यांचा तपास या कारवाईत उघडकीस आला आहे.























































