
बॉलिवूड चित्रपटांमध्ये पुरुष पात्राला मर्दानी किंवा बलवान दाखवण्यासाठी धूम्रपान हा एक सोपा मार्ग मानला जातो. नायकाच्या हातात सिगारेट, चेहऱ्यावर गंभीर भाव आणि पार्श्वभूमीवर दमदार संगीत असलेली ही शैली अनेकदा चित्रपटांच्या पोस्टर्समध्ये पाहायला मिळते. मात्र, आता चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी याच शैलीवर आणि चित्रपटांच्या पोस्टर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
संजय गुप्ता यांनी रविवार, 27 सप्टेंबर रोजी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर तीन वेगवेगळ्या चित्रपटांच्या पोस्टर्सचा एक कोलाज शेअर केला. यामध्ये ‘ॲनिमल’ चित्रपटातील रणबीर कपूर, ‘धुरंधर’मधील रणवीर सिंग आणि ‘लव्ह अँड वॉर’मधील विकी कौशल हे कलाकार सिगारेट ओढताना दिसत आहेत. हे तीन वेगळे चित्रपट आणि वेगवेगळे कलाकार असले, तरी या चित्रांमध्ये सिगारेट हे एकमेव साम्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. या पोस्टर्सचा संदर्भ देत संजय गुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर चित्रपटांच्या पोस्टरवरच नायक सिगारेट ओढत स्टायलिश पोझमध्ये दिसत असेल, तर चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या धूम्रपानविरोधी संदेशांचा नेमका काय उपयोग? त्यांनी लिहिले की, जेव्हा चित्रपटांची पोस्टर्सच अशी असतात, तेव्हा आपल्याला पाहाव्या लागणाऱ्या धूम्रपानविरोधी रील्सचा काहीच फायदा होत नाही.
What is the point of those unpleasant anti smoking reels we have to endure before and during films when these are the posters of the films? pic.twitter.com/oQSkEWkTZl
— Sanjay Gupta (@_SanjayGupta) September 27, 2026
संजय गुप्ता यांची ही पोस्ट समोर येताच कमेंट्स सेक्शनमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आणि चर्चा सुरू झाली. काहींनी त्यांच्या मुद्द्याला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यांना त्यांच्याच भूतकाळाची आठवण करून दिली. एका युझरने 2002 मधील त्यांच्या ‘कांटे’ चित्रपटाचा संदर्भ देत विचारले की, ज्या चित्रपटात संजय दत्त सिगारेट ओढताना दिसला होता, तो दिग्दर्शक आज धूम्रपानाच्या पोस्टर्सवर प्रश्न कसा उपस्थित करू शकतो? यावर उत्तर देताना गुप्ता यांनी स्पष्ट केले की, त्या काळात धूम्रपानासंबंधीचे नियम आणि जनजागृतीचे संदेश आजच्याइतके प्रचलित नव्हते. या संपूर्ण चर्चेदरम्यान एका सोशल मीडिया युझरने चित्रपटांमध्ये सिगारेटला पुरुषत्वाशी जोडण्याच्या मानसिकतेवरही बोट ठेवले.


























































