
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एकूण 16 लाख फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधी तिवारी हिने राहत्या घरात आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. निधीच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. 2024 मध्ये निधी हिने ‘मिस प्रिटी इंडिया’चा किताब जिंकला होता. त्यानंतर मॉडेलिंग व अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक मध्य प्रदेशातील भुसा मोड येथील राहत्या घरी शनिवारी तिने जीवन संपवलं.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, निधीचे फेसबुकवर सुमारे 9 लाख आणि इंस्टाग्रामवर जवळपास 7 लाख फॉलोअर्स आहेत. निधीच्या पोस्ट्सना नियमितपणे हजारो प्रतिक्रिया मिळायच्या, तर तिचे व्हिडिओ लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे. शनिवारी निधीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी फोनवर कोणाशीतरी बोलत असतानाच तिने कथितरीत्या आत्महत्या केली. कॉल रेकॉर्ड्स, डिजिटल ॲक्टिव्हिटी आणि इतर संबंधित पुराव्यांची तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.





















































