
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी (२८ सप्टेंबर) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या. चांदीचा भाव किलोमागे तब्बल 9 हजार 158 रुपयांनी कमी झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 4 हजार रुपयांहून अधिक घसरला.
गेल्या आठवड्यातील चढ-उतारानंतर नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांचे लक्ष सोने-चांदीच्या बाजाराकडे लागले आहे. सोमवारी चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारात एक किलो चांदीचा भाव 2 लाख 32 हजार 350 रुपयांवरून घसरून 2 लाख 23 हजार 192 रुपयांवर आला. म्हणजेच चांदीच्या दरात एका दिवसात किलोमागे 9 हजार 158 रुपयांची घट झाली.
देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचे दर घसरले. IBJA च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या शुक्रवारी 1 लाख 52 हजार 113 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोमवारी तो घसरून 1 लाख 48 हजार 040 रुपयांवर आला. त्यामुळेच सोन्याच्या दरामध्ये 4 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे असे वृत्त आज तक ने दिले आहे. IBJA जाहीर करत असलेले दर देशभरातील सराफा बाजारासाठी संदर्भ म्हणून वापरले जातात. मात्र, प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना या दरांव्यतिरिक्त 3 टक्के जीएसटी आणि घडणावळीचे शुल्क भरावे लागते. त्यामुळे ग्राहकांना दागिन्यांसाठी मोजावी लागणारी अंतिम किंमत अधिक असू शकते.






















































