
शिवसेनेचे मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची आज रात्री अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. प्रदीप पुर्णेकर यांनी स्थानिक बिल्डरविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनासाठी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात परवानगी मागितली होती. त्यानंतर दोन दिवसातच त्यांच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुर्णेकर यांच्या हत्येवरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून पोस्ट शेअर करत पुर्णेकरांना श्रद्धांजली वाहिली व राज्यात सध्या सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललंय अशा शब्दात चिंता व्यक्त केली.
”आमच्या पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर ह्यांची काल रात्री ठाणे परिसरात काही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललंय.पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतील, पण राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारं वातावरण तयार होत असेल तर पोलीस विभाग तरी काय करणार?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच या हत्येतील गुन्हेगारांना आणि त्यामागील शक्तीला ताबडतोब अटक होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली.
पुर्णेकरांना वाहिली श्रद्धांजली
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून पुर्णेकरांना श्रद्धांजली वाहिली. ”पुर्णेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तांना ह्या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करतो”, असे त्यांनी ट्विट केले आहे.
























































