
रिक्षा-टॅक्सींसह इतर व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा’ दुसरा टप्पा शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. अमराठी चालकांना याअंतर्गत मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत. मराठी न शिकणाऱ्या चालकांना २८ ऑगस्ट २०२७ पासून कारवाईला सामोरे जावे लागेल.
राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सींसह सर्व व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांना मराठी भाषा बोलता-वाचता येणे बंधनकारक केले आहे. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान शुक्रवारपासून सुरू केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात निवडक केंद्रांवर २ ऑक्टोबर २०२६ ते २३ जानेवारी २०२७ या कालावधीत मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी ११ वाजता ठाण्यातील रघुनाथ नगर येथील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे.
अमराठी चालकांना पुन्हा परिवहन मंत्र्यांचा दम
मुख्यमंत्र्यांनी अमराठी चालकांच्या संघटनेच्या विनंतीवरून मराठी शिकण्याची मुदत २८ ऑगस्ट २०२७ पर्यंत वाढवली आहे. तथापि, कोणी याचा गैरफायदा घेऊन ‘मराठी भाषा शिकणारच नाही’ अशी मुजोरी करत असेल, तर त्यांना कायद्याच्या कक्षेत राहून होणाऱ्या नियमभंगाच्या कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा अमराठी चालकांना दिला आहे.























































