
कर्करोग पीडितेला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या अल्पवयीन पीडितेला कर्करोगासह डेंग्यू व अन्य त्रास सुरू झाला आहे. यामुळे गर्भपाताची प्रक्रिया करण्यात अडथळा निर्माण होत आहे.
मूळची पश्चिम बंगाल येथील ही पीडिता असून ती 14 वर्षांची आहे. तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्भपातासाठी तिने आईमार्फत याचिका दाखल केली. न्या. भारती डांगरे व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या पीडितेचा गर्भ 23 आठवड्यांचा आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाशिवाय गर्भपाताची परवानगी करून घ्यावी, असे आदेश न्यायालयाने रुग्णालयाला दिले होते. मात्र ती गंभीर आजाराने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत गर्भपाताची प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी थोडा वेळ थांबावे लागेल, असे डॉक्टरांनी न्यायालयाला सांगितले. त्याची न्यायालयाने नोंद करून घेतली. या पीडितेला होणाऱ्या वेदनांसंदर्भात आम्हाला तीव्र संवेदना आहेत. त्यामुळे सुनावणी 7 ऑक्टोबरपर्यंत तहपूब करत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
राज्य शासनाने मदत करावी
महिला व बालकल्याण किंवा अन्य कोणत्या विभागामार्फत या पीडितेला काही आर्थिक सहाय्य करता येईल का याचा आढावा राज्य शासनाने घ्यावा, असे आदेश न्यायालयाने सरकारी वकील ज्योती चव्हाण यांना दिले.























































