
डोंबिवलीतील शास्त्राrनगर रुग्णालयातील डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्याच रमेश पवार, प्रमोद निकम व अक्षय कारंडे या चार आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असून त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत कल्याण न्यायालयात शरण येण्याचा आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आज न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने जलदगती न्यायालयाला हा खटला आदेश जारी झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय या खटल्यादरम्यान, डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी तसेच महत्त्वाच्या साक्षीदारांना संरक्षण देण्याची जबाबदारी संबंधित न्यायालयावर सोपवली आहे. रमेश म्हात्रे व इतर आरोपी दिलेल्या मुदतीत शरण न आल्यास त्यांना ताब्यात घेण्यासाठी कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी रमेश म्हात्रेचा जामीन रद्द करताना तीन दिवसांत शरण येण्याचा आदेश दिला होता. ही मुदत बुधवारी मध्यरात्री 12 वाजता संपली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशात त्याला 5 ऑक्टोबरपर्यंत शरण येण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.






















































