
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत विकासकामांच्या प्रस्तावांवरून लोकप्रतिनिधी आणि पालिका अभियंत्यामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांनी विकासकामांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याबाबत जाब विचारत अभियंता संदीप टेंभेकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. भाजप सभापतींच्या दादागिरीच्या निषेधार्थ संतप्त कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.
पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांनी गेल्या ११ महिन्यांपासून विकासकामांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याबाबत जाब विचारण्यासाठी अभियंदा संदीप टेंभेकर यांना गुरुवारी दुपारी सहाव्या मजल्यावरील दालनात बोलावले होते. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर वाद वाढला. यावेळी वडनेरे यांनी शिवीगाळ करून आपल्याला मारहाण केल्याची तक्रार टेंभेकर यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पालिका इमारतीबाहेरील प्रांगणात एकत्र येत कामबंद आंदोलन केले. लोकप्रतिनिधींकडून होणारी दादागिरी सहन केली जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांच्या कृतीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
आंदोलन तीव्र होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी आंदोलनस्थळी जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले.

























































