
दुष्काळ म्हणून जाहीर केलेल्या शासनाच्या यादीत जिह्यातील करवीरसह उर्वरित सर्व तालुक्यांचा समावेश करून संकटात सापडलेल्या शेतकऱयांना तातडीने मदत करावी, या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निदर्शने करण्यात आली. पावसाअभावी नुकसान झालेली सोयाबीन, भुईमूग पिके दाखवून फडणवीस सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि चंदगड या 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.भौगोलिकदृष्टय़ा डोंगराळ भागात येणारा आणि दुष्काळाची भीषण झळ सोसणाऱया करवीर तालुक्याला या यादीतून वगळण्यात आल्यामुळे बळीराजा संतप्त झाला आहे. त्यामुळे करवीरसह उर्वरित तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत तत्काळ समावेश करून शेतकऱयांना सवलती लागू कराव्यात. बाधित शेतकऱयांना हेक्टरी 1 लाख रुपये तातडीची आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी मुबलक पिण्याचे पाणी व छावण्या तसेच चाऱयाची व्यवस्था करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील, अवधूत साळोखे, पोपट दांगट, सुरेश पवार, तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत, विशाल देवकुळे, मंजित माने, शुभांगी साळोखे, मंजू पवार, दीपक गौड, रणजीत आयरेकर यांच्यासह शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना ‘शब्दा’चा विसर – उपनेते संजय पवार
n मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. पण निवडणूक झाल्यानंतर ते गप्प आहेत. आताही शेतकरी संकटात असताना त्यांनी दिलेल्या शब्दावर कोणाचा विश्वास नसल्याचा आरोप करत, दुष्काळाची पाहणी करण्यास आलेले अधिकारी व कर्मचारी शेतकऱयांकडून पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा अधिकाऱयांना तत्काळ निलंबित करावे; अन्यथा दुखावलेला शेतकरी त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपनेते संजय पवार यांनी दिला.


























































