
पेट्रोल पंपासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ लिपिकासह एका खासगी इसमाविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागातील कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
लोकसेवक सुकेश भीमराव नहारे (वय ३४) हे राष्ट्रीय महामार्ग विभाग, नांदेड कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तर सतीश माधुकर वाघोळे (वय ३०) हा खासगी इसम असून तो पारेवे कन्स्ट्रक्शन, नांदेड येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे.तक्रारदाराने पेट्रोल पंपाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. कागदपत्रांमध्ये वेळोवेळी त्रुटी काढण्यात आले. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तक्रारदार संबंधित कार्यालयात गेला असता त्याची सतीश वाघोळे याच्याशी भेट झाली. यावेळी पेट्रोल पंपाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी तसेच ना-हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून १ ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ कार्यालय, नांदेड परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान आरोपी खासगी इसम सतीश वाघोळे याने २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७(अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकसेवक सुकेश नहारे व खासगी इसम सतीश वाघोळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब पराजी धोरे, मारोती मुंगिरे,राजेंद्र पवारअमोल जाधव,विनोद पोंढगे, शेख अकबर यांनी केली आहे.


























































