नवी मुंबई एपीएमसीत इजिप्तचा कांदा, किलोला मिळाला 40 रुपयांचा दर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एपीएमसी मार्केटमध्ये आज इजिप्तचा कांदा डेरेदाखल झाला. राज्यातील कांदा 45 ते 50 रुपये किलो या दराने विकला जात असताना या पाहुण्या कांद्याला मात्र 38 ते 40 रुपये किलोचा दर मिळाला. या कांद्याची आयात जर वाढली तर राज्यातील कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये संपाताची लाट उसळली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनांनी इजिप्तमधून होणाऱ्या काद्यांच्या आयातीला विरोध केला आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत कांद्याचे उत्पादन यंदा कमी निघाले आहे. त्यामुळे उन्हाळी कांदा सध्या चढ्या दराने विकला जात आहे. उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला तेव्हा कांद्याचे दर दहा ते बारा रुपये किलोदरम्यान होते. त्यानंतर जून महिन्यात कांदा 20 ते 25 रुपये किलोपर्यंत विकला गेला. आता कांद्याचे दर थेट 45 ते 50 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. हे वाढते दर लक्षात घेता नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी इजिप्तमधून सुमारे 52 टन कांदा आयात केला. कांदा-बटाटा मार्केटमधील ई-116 या गाळ्यावर हा कांदा 38 ते 40 रुपये या दराने विकला गेला.

राज्यातील कांद्याच्या तुलनेत या कांद्याला ग्राहकांची कमी पसंती असल्याचे व्यापारी नरेश वासवाणी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत, हे सरकारला पचत नाही. त्यामुळे त्यांनी कांद्याच्या आयातीला परवानगी दिली आहे. आणखी कंटेनर आले तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय

राज्यातील शेतकऱ्यांनी यंदा फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये कांदा पिकवला आहे. कांद्याला चांगले दर आल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. मात्र काही कंपन्यांनी परदेशातून कांदा आयात करण्यास सुरुवात केल्याने त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. कांद्याचे वाढलेले दर हे फक्त लाल कांद्याचा हंगाम सुरू होण्यापर्यंत राहणार आहेत. त्यानंतर ते कमी होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच परदेशी कांद्याची झालेली आयात ही राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीतील व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली आहे.