बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत, पिंजरा त्वरित लावण्याची वनविभागाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबट्याच्या दहशतीमुळे किन्हवलीच्या गुंडेगावातील रहिवाशांची झोप उडाली आहे. दबक्या पावलाने तो कधीही येतो… आणि सर्वांना घाबरवून निघून जातो. त्याला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. दोन वेळा या कॅमेऱ्यात तो कैदही झाला. पण प्रत्यक्षात त्याला पकडण्यात अद्यापि यश आलेले नाही. कुणीतरी आहे तिथे… या भीतीने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण हैराण झाले आहेत. दरम्यान सुसज्ज पिंजरा लावून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी गुंडेवासीयांनी वनविभागाकडे केली आहे.

शहापूर तालुक्यातील डोळखांब व गुंडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्याने शेळी, वासरू व कुत्र्यांवरदेखील हल्ले केले आहेत. गुंडे गावातील एका शाळेजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रविवारी बिबट्या कैद झाला होता.

रात्री पेट्रोलिंग करा

गुंडे गावातील ग्रामस्थ संकेत चौधरी यांच्यासह अन्य गावकऱ्यांनीदेखील वनविभागाला निवेदन देत ट्रॅप कॅमेरे तसेच पिंजरा बसवावा आणि रात्रीचे पेट्रोलिंग सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. बिबट्याच्या वावरामुळे महिला, लहान मुले व वृद्धांना रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास भीती असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.