रायगड झेडपीने दिलेले ढोल फुटले, टाळ तुटले; शिवसेनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील 1 हजार 200 भजनी मंडळांना जिल्हा परिषदेकडून सहा जोड टाळ आणि ढोलक्यांचे वाटप करण्यात आले. या खरेदीसाठी सुमारे 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र उत्सव संपण्यापूर्वीच काही मंडळांच्या ढोलक्या फुटल्या असून टाळही तुटले आहेत. याबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आवाज उठवला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेने टाळ आणि ढोलक्यांचे वितरण केले होते. मात्र प्रत्यक्षात मिळालेले साहित्य अपेक्षित दर्जाचे नसल्याचा दावा भोईर यांनी केला आहे. सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता काही दिवसांतच उघड झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. कमी दर्जाचे साहित्य चढ्या किमतीत खखरेदी करण्यात आले असून या प्रक्रियेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही भोईर यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

साहित्य परत केले नाही

साहित्य खरेदी करण्यापूर्वी संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा अभिप्राय घेण्यात आला होता. तसेच रीतसर प्रक्रिया राबवूनच हे वाटप करण्यात आलेले आहे. आमच्यापर्यंत एकाही भजनी मंडळाची साहित्य निकृष्ट असल्याची तक्रार आलेली नाही किंवा एकाही भजनी मंडळाने दिलेले साहित्य परत केलेले नाही, असे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले.