
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नागोठण्यात जोगेश्वरी मातेचा जागर होणार आहे. 11 ते 19 ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून जोगेश्वरी मातेचे मंदिर व परिसरातील तीन तळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येईल. यंदाही नवरात्रोत्सवासाठी नागोठण्यासह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जोगेश्वरी मातेचे भक्त येणार आहेत. नऊ दिवस भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम होणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी माता मंदिराच्या सभामंडपात मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन केले होते. जोगेश्वरी मातेसह भैरवनाथ महाराज व वाघेश्वर महाराज नवरात्रोत्सवाबाबतही विचारविनिमय करण्यात आला. रविवार 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. दररोज जोगेश्वरी माता, भैरवनाथ व वाघेश्वर महाराज यांना नवनवीन पारंपरिक वस्त्रे व दागदागिने परिधान केले जातील. त्याच प्रमाणे भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी हरिपाठ, महाआरती तसेच वेगवेगळ्या आळींचे गरबा नृत्य होणार आहे. रात्री कीर्तन तसेच जागराचा कार्यक्रम होणार आहे. नऊ दिवस खडकआळी, प्रभूआळी, आंगरआळी, कुंभारआळी, मराठाआळी, गवळआळी, कोळीवाडा, रामनगर यांचा जागता पहारा असणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी विश्वस्त, ग्रामस्थांची सभा यांची उपस्थिती
या बैठकीला मंदिर ट्रस्ट सचिव दिलीप टके, मंदिर वतनदार मानकरी राजेश पोवळे, जयराम पवार, उत्सव कमिटी अध्यक्ष चंद्रकात ताडकर, सचिव विवेक देशपांडे, माजी अध्यक्ष विलास चौलक आदी उपस्थित होते. विठ्ठल खंडागळे, महेंद्र पोवळे, नीलेश पोवळे, चेतन पोवळे, रोहिदास हातलोनकर, महेंद्र पवार, संतोष चितळकर, मच्छिंद्र साळुंखे, बाळा पोटे, दिगंबर खराडे, संजय अधिकारी, अशोक गुरव, बाळा गुरव, किसन भोय, मिलिंद गुरव, विजय नागोठणेकर, सुरेश गीजे, नारायण तेलंगे, बबली खंडागळे, बाळू रटाटे, पांडुरंग कोळी, संजय पाटील यांनीही हजेरी लावली.





























































