Gyanu It’s Done Bro! ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, अभिजीत दीपकेंची मागणी; शिवाजी पार्क परिसर CJPच्या आंदोलनाने दणाणला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील लोकशाहीला अडचणीत आणणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली आहे. देशातील निवडणूक घोटाळ्याचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘सीजेपी’कडून आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, “आज गांधी जयंतीच्या निमित्त आपण आपल्या अधिकारांसाठी लढतोय. यापेक्षा गांधीजींना मोठी श्रद्धांजली नाही. इंग्रजांनी जेवढं गांधीजींना त्रास दिला नसेल तेवढा त्रास हे संघाचे लोक आम्हाला दिला. त्यांना वाटत होतं की, गांधींना गोळी घालून त्यांचा विचार संपवू शकतील. पण गांधी कधी मरत नाहीत.”

ते म्हणाले की, “गांधीजी हे या देशाचा आत्मा आहे. जोपर्यंत आमच्यासारखे युवक आहेत तोपर्यंत या देशात गांधीजी जिवंत राहतील. नथुराम गोडसेसारखे हजारो येतील आणि हजारो जातील. गांधीजींच्या विचाराने हा देश पुढे चालेल.” यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत अभिजीत दीपके म्हणाले की, “पुढे कुणी महामानव येईल आणि स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणेल. अरे ते सांगायची गरज नाही, तुम्ही माणूस नाहीत. ते म्हणतील आम्ही विश्वगुरू आहोत. पण ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी भारताला फक्त गांधीजींचा देश म्हणूनच ओळखले जाईल. गांधी नेहरू आणि आंबेडकर यांच्यापेक्षा मोठं व्हायची कुणाची लायकी नाही.” ते म्हणाले की, “ज्या वेळी आपल्या देशातील लोकांना मतदानाचा अधिकार माहिती नव्हता त्या वेळी नेहरू आणि आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला. जर गांधीजी या देशाचा आत्मा असतील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचा कणा आहेत आणि पंडित नेहरू या देशाचं मन आहेत. या तिघांच्या समोर तुम्ही काहीच नाही.” यावेळी दीपके यांनी मुंबई पोलीस, मराठी माध्यम, शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आभार मानले.

दरम्यान, हमारे वोट का हिसाब… हमें दे दो ज्ञानेश कसाब, एक जिया दोन अजवाईन… ज्ञानेश कुमार दो रिजाईन, एक बिस्किट दोन चाय… ज्ञानेकुमार बाय बाय, ग्यानू बाबु इट्स डन ब्रो, एक चाय दोन खारी, ग्यानू अब तेरी बारी… अशा घोषणांनी शिवाजी पार्कचा आसमंत दणाणला.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती लावली. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलकांना जोरदार पाठिंबा दिला. सीजेपीच्या या आंदोलनात शिवसेनेचे आमदार महेश सावंत उपस्थित होते. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना बरं वाटत नसल्याने ते आंदोलनासाठी येऊ शकले नाही. शिवसेनेचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा राहील, असे आमदार महेश सावंत यांनी सांगितले.

या आंदोलनात बॉलिवूडमधील कलाकर नसीरुद्दीन शाह, शबानामा आझमी, गायक विशाल ददलानी हे उपस्थित होते. विशेष म्हणजे कामाठी पुरातील महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तसेच रखरखत्या उन्हात सकाळपासूनच आंदोलक शिवाजी पार्कवर धडकत होते. कोणालाही कसला त्रास झाल्यास संबंधितांना तत्काळ उपचार मिळावे याकरिता नवी मुंबईतले डॉ नितीन दिघे व खोपोली येथील डॉ. पठाण हे आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन तैनात होते. सकाळ पासून ३५० ओआर एसचे पाऊच वाटण्याबरोबर अंगदुखी वगैरेंचे औषधं दिली. ही वैद्यकीय सेवा त्यांनी स्वखर्चाने स्वयंप्रेरणेने केली.