
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावानंतर एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर शासनाकडून बदली करण्यात आली आहे.
मिळलेल्या दोन वर्षांपूर्वी महेंद्र हरपाळकर यांची एमपीएससीच्या सचिवपदी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणामुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा संताप आणि आक्रोश शिगेला पोहोचला होता.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांसह सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या राजीनाम्याची किंवा बदलीची आग्रही मागणी लावून धरली होती. ३० तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या सकारात्मक चर्चेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ तारखेला शासनाने हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश काढले. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.





























































