
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया, मतदार याद्यांमधील घोळ, ईव्हीएम मशीन अशा विविध गोष्टींना लक्ष्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. निवडणूक आयोगाविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांचा समाचार घेत राज ठाकरे म्हणाले की, ‘सत्ताधाऱ्यांविषयी आम्हाला कुठली असूया नाही, आम्हाला कुठचा राग नाही की तुम्ही सत्तेवर बसला आहात. मात्र तुम्ही सत्ता कशी राबवताय आणि कशातून राबवताय त्याचा राग आहे’. तसेच ‘या देशातील मतदारांनी ठरवावे कुणाला निवडून द्यायचे, कुणाला सत्तेवर बसवायचे, कुणाला विरोधी पक्षात बसवायचे. लोकांनी ठरवावे, निवडणूक आयोगाने नाही’, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईमध्ये आयोजित विराट गर्जना मोर्चामध्ये ते बोलत होते.
इथे उन्हामुळे वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे वोट चोरीच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशातही वातावरण तापले आहे. 2018 पासून मी यात काहीतरी घोळ, चोऱ्या सुरू असल्याचे बोलतोय. यासंदर्भात मी सोनिया गांधी, ममत बॅनर्जी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. निवडणूक आयोग, ईव्हीएम, मतदार याद्यांतील घोळ याविरोधात आपण ठोस पावलं उचलली पाहिजे असे मी सांगत्याने सांगतोय. जोपर्यंत या गोष्टी स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाका, तरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही सुचवले होते. अचानक विरोधी पक्षांची मते कमी होणे आणि भाजपची मते प्रचंड प्रमाणात वाढणे अशक्य आहे. सुरुवातीला सर्वांनी माझ्या म्हणण्याला होकार दिला, पण मी नक्की काय सांगत होतो हे आता सर्वांच्या लक्षात येत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
लाखो मतं अचानक वाढली कशी?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाला पूर्ण बहुमत मिळाले. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता, कुठलाही जल्लोष नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता, हा कोणता विजय? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात तब्बल 40 ते 60 लाख मतदार अचानक वाढले. हे मतदार अचानक कसे वाढतात? असा कोणता व्हायग्रा आहे ज्यामुळे मतदारांची संख्या इतक्या धडाधडा वाढते? लोकसभा निवडणुकीत भाजपला 2 कोटी 44 लाख 27 हजार मते मिळाली होती. सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती थेट 3 कोटी 16 लाख 16 हजार झाली. म्हणजेच काही महिन्यांत भाजपची लाखो मते वाढली. आता सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.
देशात मनमानी कारभार सुरू
तुम्ही सत्तेवर बसला आहात म्हणून आम्हाला कुठलेही असूया नाही किंवा कुठला राग नाही. तुम्ही सत्ता कशी राबवताय आणि कशातून राबवताय त्याचा राग आहे. या देशातील मतदारांनी ठरवावे कुणाला निवडून द्यायचे, कुणाला सत्तेवर बसवायचे किंवा कुणाला विरोधी पक्षात बसवायचे. हे लोकांनी ठरवावे, निवडणूक आयोगाने नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. पण देशात मनमानी कारभार सुरू आहे. एका उद्योगपतीला जंगलं, जमिनी, विमानतळं, पोर्ट देऊन टाकायचे. आम्ही काहीही केले तरी फरक पडत नाही, आम्ही जे मनात आणून ते करू, हे येते कुठून? देशातील जनतेने कितीही ओरडावे, बोलावे, आंदोलनं करावी, मोर्चे काढावेत, पण निवडणूक आयोग आमच्या बरोबर असेल तर आम्ही कसेही निवडून येऊ, आम्हाला जसे वागायचे तसे वागू. देशाची आर्थिक स्थिती बरबाद करून टाकू. अमेरिकेपुढे सरेंडर होऊ. पेट्रोलचे भाव, अन्न धान्याचे भाव वाढवू, तुम्हाला रांगेत उभा करू हे सर्व निवडणूक आयोगाला बांधल्याशिवाय येऊ शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
…त्याच क्षणाला जायलाही सुरुवात होते
कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर बसलेला असतो तेव्हा त्याला एक धाकधूक असते. उद्या जर आपण एखादे पाऊल उचलल्यानंतर लोकांनी आपल्याला मतदान केले नाही. सत्ता गेली तर काय होईल. पण अशी कोणतीही भीती ना महाराष्ट्रात, ना केंद्रात दिसते. आमचा विरोध कुठल्या उद्योपगतीला नाही. उद्यागपती या देशात हवे आहेत. काँग्रेसच्या काळातही अनेक उद्योगपती उभे राहिले. पण यांच्या काळात फक्त एकच उद्योगपती मोठा होताना दिसत आहे. ही हिंमत आली कुठून? याचे कारण सुप्रीम कोर्ट, सगळे हाय कोर्ट आणि चॅनेल ताब्यात घेऊन ठेवले आहेत. तुमच्यापर्यंत खऱ्या बातम्या पोहोचू देत नाहीत. पण सत्तेतील लोकांनीही विचार करायला हवा की आपण उचललेले चुकीचे पाऊल, चुकीचे धोरण याचा भविष्यात पायंडा तर पडणार नाही ना. कारण सत्ता ज्या दिवशी यायला सुरुवात होते, त्याच क्षणाला जायलाही सुरुवात होते. तुम्ही किती काळ ती पुढे ढकलताय एवढाच फक्त विषय असतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
ज्या दिवशी तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि….
आज भाजप सत्तेवर आहे. उद्या दुसरा कोणता तरी पक्ष सत्तेवर असेल. तो पक्ष सत्तेवर आल्यावर आणि त्यांनीही अशाच प्रकारे सत्ता राबवायची ठरवले तर तुम्ही काय कराल. उद्या दुसरे पक्ष येऊन त्यांनी दामदुप्पटीने या गोष्टी केल्या तर कुठे जाल. आपण या देशाचा ढाचा बदलत आहोत. कोसळून टाकत आहोत. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांनी जगायचे कसे. कशाही पद्धतीने सत्तेवर यायचे आणि लोकांवर वरवंटा फिरवायचा, तर कसे होईल. याविरोधात आजचा मोर्चा असून सर्व राजकीय पक्ष व्यासपीठावर आहेत. सत्तेतील लोकांनी याचा विचार करणे गरजेचे आहे की, ज्या दिवशी तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि दुसरे सत्तेवर येतील तेव्हा ते तुम्ही करत असलेली गोष्ट दामदुप्पटीने केली तर काय करणार आहात. जो लोकांसमोर जाईल, चांगले काम करेल त्याला लोक मतदान करतील. पण लोकांना अंधारत ठेऊन, बोगस मतदार वाढवून त्याच्यातून सत्ताप्राप्ती किती दिवस चालणार, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रातील SIR संपूर्ण रद्द करा; बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एसआयआर संपूर्ण रद्द झाला पाहिजे आणि देशातील वोटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे, अशी मागणीही केली. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जो एसआयआर झाला तो संपूर्ण रद्द झाला पाहिजे. माजी केंद्रीय गृहसचिव आणि मोदींच्या काळातील भाजपचे मंत्री आर.के.सिंह यांनीही याबाबत आपले मत व्यक्त केलेले आहे. एसआयआर ही अपवादात्मक परिस्थितीत विशिष्ट मतदारसंघ आणि भागापुरती करण्याची प्रक्रिया आहे. संपूर्ण देशात एकाचवेळी एसआयआर राबवणे बेकायदेशीर आहे. संपूर्ण देशात किंवा राज्यभर एसआयआर राबवण्याची तरतूद कायद्यात नाही. एखादी नैसर्गिक आपत्ती आली, जसे की पूर, भूकंप, एखाद्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात माणसं स्थलांतरित झाली किंवा डुप्लिकेट नावे असल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात आली तरच एसआयआर केले जाऊ शकते. मग इथे सरसरकट एसआयआर कशासाठी केले गेले. एसआयआरचे प्रकरण बेकायदेशीर आहे. एसआयआरच्या माध्यमातून दोन कोटी मतदार बाहेर काढले. हे मतदार कोण आहेत. त्यामुळे दिल्लीतही विरोधकांनी एसआयआर रद्द झाल्याची मागणी केली पाहिजे आणि देशातील वोटिंग मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर दूध का दूध पाणी का पाणी होईल, असेही राज ठाकरे म्हणाले.

























































