
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि आयोगाचे अध्यक्ष यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आंदोलनाचा तिसरा दिवस संपला तरीही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. किडलेल्या व्यवस्थेच्या भ्रष्ट सम्राटाला पदावरून लवकरात लवकर हटवले नाही, तर अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल, असा गंभीर इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना धीर दिला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीच्या कारभारावर ताशेरे ओढताना रोहित पवार म्हणाले की, ‘एमपीएससीचे अध्यक्ष भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहाचा आज तिसरा दिवस संपला, तरीही सरकार ढिम्म असल्याचे दिसत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, पेपरफुटीची प्रकरणे चव्हाट्यावर आणणारे विद्यार्थी ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, प्रियांका चौधरी, नितीन गिते, अभिजित गोरे, ओंकार डोके-पाटील आणि गजानन शेळके यांनी काल रात्रीपासून सत्याग्रहासोबतच आमरण अन्नत्याग आंदोलनही सुरू केले आहे’.
#MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या सत्याग्रहाचा आज तिसरा दिवस संपला तरी अद्याप सरकार ढिम्म आहे. त्यामुळं झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जागं करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ज्यांनी #MPSC च्या पेपरफुटीची लक्तर वेशीवर टांगली तो विद्यार्थी ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, प्रियांका चौधरी, नितीन गिते, अभिजित गोरे, ओंकार डोके-पाटील आणि गजानन शेळके यांनी काल रात्रीपासून सत्याग्रहासोबतच अन्नत्याग आंदोलनही सुरु केलं. किडलेल्या व्यवस्थेच्या भ्रष्ट सम्राटाला पदावरून लवकर हटवलं नाही तर अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढत जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2026
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर विद्यार्थ्यांचा हा रोष आणि अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेणाऱ्यांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

























































